जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न;
बुलढाणा,दि.25 : राज्य व केंद्र शासनामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा व योजना सुरू केल्या आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील जेष्ठासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. या सुविधा व योजनांचा लाभ जेष्ठ नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण, जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे सचिव डॉ. राजीव मिश्रा, डॉ. सुरेश छाजेड, डॉ. वसंतराव चिंचोले, डॉ. लक्ष्मणराव खर्चे, ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे मधुसूदन कुलकर्णी, तेजराव सावळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, मानसिक आजाराच्या माध्यमातून एकलेपणाची, नैराश्याची भावना निर्माण होते. यातून स्मृतीभंश, अल्झायमर सारखे आजार जेष्ठ नागरिकांना होऊ शकतात. यातून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन, विपश्यना, योगाभ्यास करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटुंबातील मुलाबाळांमधे फारसे अडकुन न पडता, आवडत असलेल्या क्षेत्रात गुंतवून ठेवावे. अध्यात्मिक क्षेत्र, कलागुण वाचन यासारख्या विविध गोष्टींमध्ये गुंतून ठेवावे. चालणे, फिरणे यासारख्या क्रियाशील बाबी रोज नियमितपणे करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी बाह्य रुग्ण विभागासोबतच आंतररुग्ण विभागही सुरू करण्यात येणार आहे. या सर्व सुविधांचा ज्येष्ठ नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले. शिबीरामध्ये 300 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी डॉ. ऋषिकेश निकम, डॉ. रवी शिंदे यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अंजली परांजपे यांनी तर आभार प्रदर्शन मधुसुधन कुळकर्णी यांनी केले.