गोंदिया,दि.२७-गोंदिया जिल्ह्यातील प्रसिध्द असलेल्या पर्यटनस्थळ कचारगड येथे येत्या १० फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाचे धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या परिसराच्या ठिकाणी देशभरातून येणार्या समाजबांधवासह पर्यटकाकरींता सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सोबतच आदिवासी समाजाच्या साँस्कृतिक जडणघडणीसह परंपरेचे दर्शन व्हावे याकरीता आदिवासी विभागाच्यावतीने धनेगाव येथे आदिवासी साँस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.ते गोंंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.यावेळी खासदार नामदेवराव किरसान,माजी खासदार अशोक नेते,आमदार इंजि.राजकुमार बडोले,संजय पुराम आदी उपस्थित होते.
कचारगड येथील यात्रेत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये तसेच परिसरातील भागातील घटनांवर नजर ठेवण्याकरीता सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,स्वच्छता विभागाच्यावतीने तात्पुरते सार्वजनिक शौचालयासह २४ तास पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.तर गेल्या १० वर्षात कचारगड याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करुनही तेथे आजही पर्यटन व तिर्थस्थळाच्या दृष्टीने सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या मुद्यावर यापुढे त्याठिकाणी वर्षभर पर्यटकांकरीता सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे ना.उईके यांनी सांगितले.