अर्जुनी मोरगाव,दि.२७ ः शेतात जात असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी (ता. २७) सकाळी साडेसातच्या सुमारास इटखेडा- संभाजीनगर रस्त्यावरील स्मशानभूमी शेडशेजारी घडली. भास्कर यादव राजगडे (वय ५०, रा. इटखेडा) असे जखमीचे नाव आहे. भास्कर राजगडे हे सकाळी सायकलने शेतात जात होते. यावेळी स्मशानभूमी शेडशेजारी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. ही बाब लक्षात येताच माजी सरपंच उद्धव मेहेंदळे व काही गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत बिबट्याला जेरबंद केले. हल्ला करणारा बिबट्याही जखमी होता. कोहमारा-वडसा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. भास्कर राजगडे यांच्यावर आैषधोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.