स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प ठेवून कचारगड यात्रेचे प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे-आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

0
271
  • कचारगड यात्रा पुर्वतयारी आढावा

       गोंदिया, दि.27 : आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिध्द आहे. या ठिकाणी दरवर्षी फरवरी माघ पौर्णिमेनिमित्त पाच दिवसाच्या गाव जत्रेचे आयोजन करण्यात येते. सदर यात्रेस मोठ्या प्रमाणात झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातुन भाविक येथे येत असतात. यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही त्यादृष्टीने स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प ठेवून कचारगड यात्रेचे प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिले.

          सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत यात्रा होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आज (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री महोदयांनी पुर्वतयारी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, राजकुमार बडोले, संजय पुराम, गडचिरोली आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

           मंत्री डॉ.अशोक उईके म्हणाले, कचारगड यात्रेनिमित्ताने स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा नियोजनबध्द कृती आराखडा तयार करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भक्त निवासाची व्यवस्था करण्यात यावी. लाईटींगची व्यवस्था करतांनी अधिक समयसूचकतेने लाईट लावावे. यात्रेदरम्यान वीज खंडीत होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य पथक तैनात करण्यात यावे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवावा. कचारगड यात्रेत प्रत्येक भक्तांचा सन्मान झाला पाहिजे याची दक्षता घेण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावी. स्वच्छता उत्तम ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे. कचारगड यात्रेची इतर राज्यातील भाविकांनी सुध्दा प्रेरणा घ्यावी असे आपल्या जिल्ह्याचे नावलौकीक करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

           प्रास्ताविक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान नियंत्रण कक्ष स्थापन करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, विजेची अखंडीत सोय, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याच्या दृष्टीने योग्य त्या आरोग्य सुविधा, यात्रेदरम्यान भाविकांसाठी 15 बसेसची व्यवस्था, नगर परिषद मोबाईल टॉयलेट, अग्नीशमन व्यवस्था, भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे अंमलबजावणी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहे. कचारगड देवस्थान येथून जवळच असलेले हाजराफॉल पर्यटन स्थळ येथे सुध्दा योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

           सभेला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, प्रकल्प अधिकारी देवरी उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी भंडारा किरण मोरे, सालेकसा तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, कचारगड यात्रा समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, ग्रामपंचायत कोसमतर्रा सरपंच सिंधू घरत यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.