मुंबई विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराची घोषणा

0
20

उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाकडून होणार गौरव

विद्यापीठ विभाग आणि संलग्नित महाविद्यालयीत प्रत्येकी तीन मुले आणि तीन मुलींची होणार निवड

मुंबई, दि. २७ जानेवारीः सर्वसमावेशक विद्यार्थी केंद्रीत विद्यार्थ्यांचे हित जोपासत मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात आणि संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या प्रत्येकी तीन मुले आणि तीन मुलींना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानीत केले जाणार आहे. शैक्षणिक उत्कृष्टक्षम प्रतिभावंतांना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय्स आणि गोल्डन गर्ल्स अशा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये प्लॅटिनम पुरस्कारासाठी रुपये १५ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, डायमंड पुरस्कारासाठी रुपये १२ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि गोल्डन पुरस्कारासाठी रुपये १० हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराच्या निवडीचे निकषः

Ø विद्यार्थी हा शेवटच्या सत्रासाठी प्रविष्ठ असावा
Ø आधीच्या सत्रांमधील उपस्थिती ही सर्वसाधारण ७५ टक्के पेक्षा जास्त असावी
Ø पूर्वीच्या सत्रातील सर्व विषयात आणि पेपर्समध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा
Ø विद्यार्थ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झालेली नसावी

या पात्रतेच्या निकषांव्यतिरिक्त पूर्वीच्या सत्रातील शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून त्यासाठी गुणांकन दिले जाणार आहे. आंतरविद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधन कार्याच्या सादरीकरणासाठीचे गुण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकाशनांसाठीचे गुण, पेटंट, विभागस्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठीचे योगदान, क्रीडा क्षेत्रातील आंतरमहाविद्यालयीन, क्षेत्रनिहाय, राज्यस्तरीय, आंतरविद्यापीठीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धातील खेळ प्रकारातील योगदान, राष्ट्रीय सेवा योजनेतील १२० तासांचे उपक्रम, ७ दिवसांच्या निवासी शिबिरातील सहभाग, विद्यापीठ स्तर- राज्यस्तरावरील आव्हान आणि उत्कर्ष शिबिरातील सहभाग, प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये सहभाग, एनसीसीतील सहभाग, युवा महोत्सवातील क्षेत्रीय, अंतिम, इंद्रधनुष्य, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवातील सहभाग, आविष्कार संशोधन महोत्सवातील क्षेत्रीय, अंतिम, राज्यस्तरीय, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठीय अन्वेषण संशोधन स्पर्धेतील योगदान, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागासाठीच्या १२० तासांचे उपक्रम, उडान महोत्सव यासह ज्ञानस्त्रोत केंद्रात १ तासाच्या कमीतकमी ३० भेटी अशा विविध काटेकोर निकषांवरून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

कोट-

‘मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य आणि कौशल्य तसेच शैक्षणिक उत्कृष्टतेसह, सह-अभ्यासक्रम उपक्रमांतील सहभाग, कला, क्रीडा आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन करणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा अतिशय स्तूत्य उपक्रम मुंबई विद्यापीठाने या शैक्षणिक वर्षापासून हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोषक स्पर्धेचे वातावरण निर्माण होण्यात मदत होईल.’

प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ