वाशिममध्ये बालकामगार मुक्ती मोहीम; एका बालकामगाराची सुटका

0
27
वाशिम,दि.२९ जानेवारी – जिल्ह्यातील बालकामगार व किशोरवयीन कामगार (शप्रतिबंध व नियमन अधिनियम १९८६ सुधारणा २०१६ अंतर्गत विशेष धाडसत्र राबवून एका बालकामगाराची मुक्तता करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृती दलाने दि. २८ जानेवारी २०२५ रोजी वाशिम शहरातील एका आस्थापनावर धाड टाकून ही कारवाई केली.
बालकामगार मुक्ती मोहिमेचा तपशील
कृती दलाने वाशिम शहरातील सुरेश रेडीमेड स्टोअर्स, धिरज सुरेश बदलाणी, नगर परिषद शॉपिंग सेंटर, शॉप नं. २९, पाटणी चौक येथे तपासणी केली असता, तेथे एक बालकामगार कार्यरत असल्याचे आढळून आले. संबंधित बालकामगाराची सुटका करून आस्थापना धारकाविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाई आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक:
बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार, कोणत्याही आस्थापनात बालकामगार कार्यरत असल्यास, नागरिक, पोलिस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतात. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १४ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून बालकामगार प्रथेला पूर्णतः आळा घालण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
यशस्वी कारवाईसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग
या मोहिमेचे नेतृत्व प्र. दुकाने निरीक्षक योगेश गोटे यांनी केले. कामगार अमरावती उपआयुक्त नितीन पाटणकर, सरकारी कामगार अधिकारी वाशिम राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याशिवाय, मोहिमेत विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम बबन सुर्वे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर आरोग्य विभाग, कनिष्ठ लिपिक, नगर परिषद वाशिम महेश वानखेडे, अमोल देशपांडे जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा प्रकल्प समन्वयक, चाईल्ड हेल्पलाईन कॉन्स्टेबल दिपक कावरखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अष्टसिद्ध नप्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांनी सर्व नागरिकांना बालकामगार प्रथेविरोधात सजग राहण्याचे आणि अशा प्रकरणांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.