= सहकार मंत्र्यांना दिले निवेदन =
सडक अर्जुनी दि.२९: अर्जुनी मोरगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सडक /अर्जुनी येथे सहाय्यक निबंधक कार्यालय त्वरित मंजूर करावे यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून त्यासंबंधाने राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांना आमदार बडोले यांनी 26 जानेवारीला निवेदन दिले.
गोंदिया जिल्ह्यातील सडक/ अर्जुनी तालुका हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील नागरिकांची सहकारी संस्था संबंधी कामे प्रामुख्याने सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संबंधित असतात. परंतु सद्यस्थितीत हे कार्यालय देवरी येथे असल्यामुळे सडक /अर्जुनी व परिसरातील नागरिकांना कामासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होते. सडक अर्जुनी तालुक्यातील लोकसंख्या व सहकारी संस्थांची संख्या लक्षात घेता येथे सहाय्यक निबंधक कार्यालयाची तातडीची आवश्यकता आहे. हे कार्यालय मंजूर झाल्यास स्थानिक नागरिकांना त्यांच्या सहकारी संस्थेच्या कामासाठी सोयीचे होईल व प्रशासन अधिक गतिशील व प्रभावी होईल. करिता सडक /अर्जुनी येथे सहाय्यक निबंध कार्यालय त्वरित मंजूर करण्यात यावे अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी पालक मंत्र्याकडे केली आहे.