एकतेतून प्रत्येकाला मिळावा सन्मान – प्रा. मिलिंद मराठे

0
11
-विद्यापीठात सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता कार्यशाळा
नागपूर :मानव म्हणून समान असल्याची भावना ठेवत एकतेतून प्रत्येकाला सन्मान मिळावा, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक ट्रस्टचे अध्यक्ष प्रो. मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले. भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय पुरस्कृत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आयक्यूएसी विभाग आणि कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवशीय ‘सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ए. के. डोरले सभागृहात बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनिय कार्यक्रमात प्रा. मराठे मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक ट्रस्टचे अध्यक्ष प्रो. मिलिंद सुधाकर मराठे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण व ईझेडसीसीच्या माजी संचालक डॉ. गौरी बासू, प्र- कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, कार्यस्थळी लैंगिक शोषण व अत्याचार विरोधी समिती अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर, पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे यांची उपस्थिती होती. प्रत्येक प्रांतात दर्शन, धर्म, संस्कृती, सभ्यता यात विविधता आढळून येत असल्याचे मराठे यांनी पुढे बोलताना सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून भारतीय सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलतेवर त्यांनी विचार व्यक्त केले. न्यूटनचे नियम सांगताना त्यांनी पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक प्रगती, एकता आणि विविधता यांचा कसा परस्पर संबंध स्पष्ट केला. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये संवेदनशीलता म्हणजे समाजाच्या सर्व घटकांची गरजा लक्षात घेऊन नाविन्याचा विकास, स्थानिक ज्ञानाचा आदर, नैतिकतेचा विचार आणि प्रादेशिक आव्हानांचा विचार करणे होय, असे प्रो. मराठे म्हणाले. विविध धर्माची संस्कृती, सभ्यता वेगळी असली तरी तत्वज्ञान सारखेच दिसून येते. संस्कृत सुभाषितांचे उदाहरण देत जगातील कोणत्याही प्रांतातील व्यक्ती एकाच उदरातून जन्मलेला असल्याने एकमेकांप्रती चांगले राहिले पाहिजे, प्रत्येकाला सन्मान देता आला पाहिजे. वसुधैव कुटुंबकम् म्हणजे वेगळे तरी काय. एकता टिकवायची असेल तर संवेदनशीलता महत्वपूर्ण असल्याचे प्रो. मराठे म्हणाले. या तीन दिवसात मानवी तत्वज्ञान, धर्म, संस्कृती, सभ्यता यावर अधिक विचार करून आणखी स्पष्टता आणू शकाल, असे त्यांनी सांगितले.
विविधतेने देशाला सुंदरता आणली – डॉ. गौरी बसू
भारत हा असाधारण सांस्कृतिक विविधतेचा देश आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश असलेला भारत प्रत्येकाच्या अद्वितीय परंपरां, भाषा आणि प्रथांमध्ये समृद्ध असून सहअस्तित्वाच्या सौंदर्याचे त्या प्रतीक असल्याच्या डॉ. गौरी बसू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सांस्कृतिक विविधता म्हणजे विविध धर्म, भाषा, सण, जेवण आणि कला रूपांचा एकसूत्री मिश्रण आहे. हिमालयांपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी संस्कृती आहे. मात्र, देशाला एक सूत्रात बांधून ठेवण्याची सांस्कृतिक संवेदनशीलता हु विविधतेत एक जबाबदारी आहे, असे डॉ. बसू म्हणाल्या.
भारतीय संस्कृती सर्व समावेशक – डॉ. प्रशान्त बोकारे
भारतीय संस्कृती सर्व समावेशक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी केले. देशात सांस्कृतिक विविधता व संवेदना महत्त्वपूर्ण मुद्दा बनला आहे. भारतात असहिष्णुता असू शकत नाही, असे देखील ते म्हणाले. कुंभमेळ्याचे उदाहरण देत या ठिकाणी विविध पंथाचे, धर्माचे लोक एकत्र येतात. त्यांच्या प्रार्थना, उपासना यात विविधता असून देखील एकत्रपणे हा उत्सव साजरा केला जातो. विविधतेत सांस्कृतिक एकता कुंभमेळ्यातून दिसून येते असे डॉ. बोकारे म्हणाले. देशाला तरुणाई पुढे नेईल. त्यांच्यावर हा सांस्कृतिक वारसा सोपवायचा आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या समन्वयक तथा कार्यस्थळी लैंगिक शोषण व अत्याचार विरोधी समितीच्या अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर विविध समुदायांमध्ये समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम या कार्यशाळेत आयोजित केले असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत ‘सांस्कृतिक विविधतेचा विज्ञानाच्या विकासावर प्रभाव’ या विषयावर पोस्टर स्पर्धा, ‘उच्च शिक्षणामध्ये सांस्कृतिक उत्तम पद्धती’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, ‘सांस्कृतिक सशक्तीकरणावर केस स्टडी’, ‘सांस्कृतिक क्विझ स्पर्धा’, आणि ‘अन्न व सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम’ आदी विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. पीएम उषा अंतर्गत विद्यापीठाने विविध सॉफ्ट स्किल कार्यशाळा आयोजित केल्या असून हा कार्यक्रम देखील त्याचाच भाग असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये आदिवासी अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य श्री विष्णू चांगदे, चार ही विद्या शाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख सांविधिक अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.