कोषागार विभाग शासनाचा आर्थिक कणा- भैय्यासाहेब बेहेरे

0
314

 कोषागार दिन उत्साहात साजरा

      गोंदिया, दि.1 : लेखा व कोषागार हा शासनाचा अत्यंत महत्वाचा विभाग असून शासनाच्या निधीचा विनियोग नियमानुसार होते की नाही ही बाब तपासण्याचे महत्वाचे काम कोषागारातून होत असते. शासनाच्या विविध विभागांना आर्थिक व वित्तीय शिस्तीचे पालन व मार्गदर्शन करण्यासाठी लेखा व कोषागार विभाग महत्वाची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे कोषागार विभाग हा शासनाचा आर्थिक कणा आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी व्यक्त केले.

         जिल्हा कोषागार कार्यालयात आज (ता.1) लेखा व कोषागार दिन साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, जिल्हा कोषागार अधिकारी समीर देशमुख, अपर कोषागार अधिकारी हरिष शेगावकर, लेखाधिकारी सर्वश्री पंधरे, बोकडे, सुखदेवे, सहायक लेखाधिकारी प्रवीन मुंडले व सेवानिवृत्त उपकोषागार अधिकारी बी.पी.भैरम यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

        प्रारंभी सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कोषागार दिनाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले.

        निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बेहेरे म्हणाले, कोषागार विभाग हा शासनाचा अन्नदाता आहे. जिल्ह्यात कोषागार विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असतांना देखील या विभागाचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत आहेत. विविध विभागात लेखा व कोषागार विभागाचे अधिकारी असून ते नियमाने शासनाचा निधी वेळीच खर्च करण्याच्या दृष्टीने दक्ष असतात. विविध योजनांचा निधी सामान्य जनतेपर्यंत व लाभार्थ्यांना वेळीच मिळाला पाहिजे यासाठी कोषागार विभागाने अतिशय काळजीपूर्वक काम करावे. काम करतांना चुका होवू नये याची आपण काळजी घ्यावी. निर्धारित वेळेत बिले कसे पास होतील याकडे या विभागाने विशेष लक्ष देण्यात यावे. वित्त विभागाचे सर्वच कामे आता संगणकीकृत करण्यात आली आहेत. लेखा व कोषागार विभागानी आता ई-कुबेर प्रणाली लागु केली आहे. त्यामुळे आता बील पास झाल्यानंतर शासनाच्या कर्मचाऱ्यांचे अवघ्या अर्ध्या-एक तासात त्यांच्या बँक खात्यात पगार जमा होत आहे. शासनाची आपल्यावर असलेली विश्वासार्हता यापुढेही टिकून राहील असे काम करावे. कोषागार कार्यालयात काम करतांना जे काही आपण काम करतो ते काम अजुन जोमाने करुन आपल्या जिल्ह्याची दुसऱ्या जिल्ह्याने प्रेरणा घ्यावी असे काम करावे असे सांगून ते पुढे म्हणाले, वर्षातून एकदा तरी लेखा व कोषागार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, त्यांचा समन्वय राहावा यासाठी हा कोषागार दिन साजरा करण्यात येतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

       1 फेब्रुवारी 1962 रोजी लेखा व कोषागार विभागाची निर्मिती करण्यात आली. म्हणून दरवर्षी 1 फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागार दिन म्हणून जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शासन विविध विभागांना निधी वितरीत करते. हा निधी लोककल्याणकारी योजना, वेतन, निवृत्तीवेतन, विविध विकासकामे यावर खर्च केला जातो. वितरीत निधी शासकीय यंत्रणांनी नियमानुसार खर्च केला किंवा नाही ही बाब तपासण्याचे महत्वाचे काम कोषागार विभागाचे असते. या विभागात अनेक स्थित्यंतरे आलीत, त्याचा या विभागाने स्विकार केला. नवीन संगणकीय प्रणालीत सुध्दा हा विभाग सक्षमपणे काम करीत आहे. शासनाचा एक आर्थिक सल्लागार म्हणून हा विभाग काम करीत आहे. यादृष्टीने कोषागार विभाग हा शासनाचा वित्तीय प्रहरी आहे असे जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सांगितले.

        याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे घेतला.यावेळी सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी विजय घाटबांधे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल कोषागार कार्यालयातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व वृक्ष रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

       यावेळी कोषागार कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदाबहार गीत सादर केले, या गीतांना श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या 5 ते 15 वर्ष वयोगटातील पाल्ल्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळा नसती तर’ हा निबंध स्पर्धेचा विषय होता. 15 वर्षावरील वयोगटासाठी माझे आई-वडील शासकीय कर्मचारी हा विषय होता. तसेच चित्रकला स्पर्धेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या औचित्याने जिल्हा कोषागार अधिकारी समीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसअगोदर श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयाची सुशोभीत सजावट केली.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी समीर देशमुख यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, उपलेखापाल, त्याचप्रमाणे कोषागार विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ कापगते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिपक डहारे यांनी मानले.