शंकर पटाला उत्साहात सुरुवात
पशुपालनाच्या जोडधंद्यातून शेतकऱ्यांनी अर्थार्जन करावे-आमदार नाना पटोले
भंडारा दि 2 : कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव सडक येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन व कृषी विकास परिषद तसेच शंभर वर्षाची परंपरा असलेल्या शंकर पटाचे आज उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नाना पटोले, उद्घाटक म्हणून लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून भंडारा गोंदिया चे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यासह जिल्हा परिषदेचे विविध पदाधिकारी, तसेच भंडारा सहकारी बँकेचे सुनील फुंडे, पिंपळगावचे सरपंच श्याम शिवणकर, जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, आत्मा प्रकल्प संचालक उर्मिला चिखले, जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यासह कृषी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनी मध्ये कृषि प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषि व संलग्न व्यवसायाबाबत चर्चासत्र व परीसंवाद, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचत गट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री ही प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रदर्शनात शेती उपयोगी औजारे, सिंचन साधने यांचे स्वतंत्र दालन, कृषि निविष्ठा, सेंद्रिय पध्दतीने उत्पादीत शेतमाल व प्रक्रिया उत्पादने, कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ आणि बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कृषि व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिकेही शेतकऱ्याना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आहे. यामध्ये बायोडायनामिक पद्धतीने खत निर्मिती, सीपीपी कल्चर निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, अझोला उत्पादन, १० ड्रम थेअरी, ड्रोन द्वारे फवारणी, भात नागवडीच्या विविध पद्धती, जैविक पद्धतीने किडनियत्रण इ. प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहीती व्हावी यासाठी विविध विषयावरील परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक आत्मा उर्मिला चिखले यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाचा प्रगती पर आढावा सादर केला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांना केंद्रित ठेवून नवीन योजना तसेच अखंडित वीज पुरवठ्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर खासदार प्रफुल पटेल यांनी शंकरपटाची परंपरा अखंडित ठेवणाऱ्या पिंपळगाव वासियांचे अभिनंदन केले. वसंत पंचमीच्या शुभेच्छा देऊन शंकरपट, हे शेतकऱ्यांच्या आस्थेचे विषय असल्याचे सांगितले. बैलजोडी शिवाय शेतीची कल्पना करता येत नाही ,मात्र आता शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान देखील शिकून घ्यावे पुढील काही वर्षात धानाचे परहे लावण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान येईल. भविष्यकाळाचा वेध घेऊन नवीन तंत्रज्ञान आणि शेती करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पशुपालनाने शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पर्याय आहे. आजच्या पशुप्रदर्शनामध्ये उच्च प्रजातींचे व दर्जेदार पशु पाहायला मिळाले ,जोड उद्योगातून शेतकरी आर्थिक रित्या सक्षम व्हावा. त्याला गुणवत्तेची बी- बियाणे ,खत -निविष्ठा मिळावे. अशी अपेक्षा अध्यक्षपदावरून बोलताना आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केली .तसेच सर्व कृषी विभागयंत्रणा तीन दिवस या प्रदर्शनस्थळी उपस्थित असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दूर करून घ्याव्यात. शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी आस्थेचा विषय असल्याने ही परंपरा पुढेही सुरू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी वृषाली देशमुख यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये…
कृषी अवजारे व उत्पादने खते, बियाणे, कीटकनाशके यांसाठी स्वतंत्र दालने.
■ पशुसंवर्धन विभागः पशु व पक्षी प्रदर्शन.
■ कृषी प्रक्रिया उत्पादने: कृषी आधारित उत्पादनांच्या विक्रीसाठी दालने.
महिला बचत गट प्रदर्शन बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री.
■ सहभागः कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, कृषी महामंडळ व खासगी कंपन्यांचा सक्रीय सहभाग.
थेट विक्रीः उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना.
■ सन्मान सोहळाः प्रगतशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा विशेष सन्मान.