तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत डिएचओ डॉ.वानखेडे यांनी दिले आरोग्य मंत्र

0
60

सालेकसा दि.02 -येथील पंचायत समिती सभागृहात जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.सदर प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी उपस्थितांना गावात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.कार्यशाळेत  जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,सालेकसा खंड विकास अधिकारी संजय पुरी , सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,पाणी गुणवत्ता विभागाचे विषय तज्ञ मुकेश त्रिपाठी सुद्धा उपस्थित होते.
डॉ.वानखेडे यांनी गावातील लोकांसोबतच शाळा,वस्तीगृह,आश्रमशाळा,यात्रेत,अंगणवाडी, सार्वजनिक टाकी ई.विविध स्त्रोतांचे पाणी पिण्यास वापरले जाते त्यांचे तसेच हातपंपाचे पाणी नियमित शुद्धीकरण करण्यात यावे. दूषित पाण्याचे सेवन अत्यंत धोकादायक असून त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या वापरापूर्वी पाणी तपासले पाहिजे आणि ते शुद्ध केले पाहिजे मग ते पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्नपदार्थांमध्ये मिश्रित पदार्थ म्हणून वापरले जात असताना.पाण्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकते. म्हणुन जलजन्य आजार टाळण्यासाठी प्रत्येक स्त्रोतांचे पाणी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठ्विण्यात यावे. स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यात न दिसणारे रोगकारक जीवजंतू असू शकतात. त्यांच्यामुळे पाणी दूषित होऊन निरनिराळे आजार उत्त्पन्न होतात. पाण्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे.क्‍लोरीनीकरण करणे हा निर्जंतुकीकरण करण्यासाठीचा सोपा उपाय आहे. यासाठी ब्लिचिंग पावडर वापरली जाते.घरात पाणी साठवायचे असल्यास त्याची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असते.पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ असावीत आणि त्यांची नियमितपणे स्वच्छता केली जावी ही भांडी बाहेरील धूळ, कचरा यांमुळे बाधित होऊ नये म्हणून व्यवस्थित झाकून ठेवावीत. पावसाच्या काळात पाणी दूषित होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढवावी, तसेच नियमितपणे ओ.टी. टेस्ट करवून घ्यावी.
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल यांनी पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत पाण्याच्या दूषित संसगनि,  कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या  पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीची माहिती असने आवश्यक आहे.पाण्यात न विरघळणारे पदार्थ असतील, माती वा गढूळपणा असेल तर पाणी गाळून घ्यावे लागते. पाणी उकळणे हा एक खात्रीशीर उपाय आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर किमान १० मिनिटे उकळावे. उकळलेले पाणी थंड करत असतान त्यात तुरटी फिरवावी. यामुळे जिवाणू-विषाणू तर नष्ट होतातच पण क्षारांचे प्रमाणसुद्धा कमी होते.त्यामुळे मुतखड्यासारखे आजारही कमी होतात.पाणी शुद्धीकरण म्हणजे दूषित पाण्यातून अवांछित रसायने, जैविक पदार्थ, वायू आणि निलंबित घन पदार्थ काढून टाकणे. या प्रक्रियेमुळे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. पाणी शुद्धीकरणाच्या काही पद्धती आहेत त्यात पाण्यात तुरटी मिसळणे,पाणी उकळणे,पाण्यात ब्लीचचे थेंब टाकणे,पाण्यात क्लोरीन टाकणे ई. वापरण्यात येत असतात.
तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत पाणी गुणवत्ता निरीक्षक,विस्तार अधिकारी,गट समन्वयक, ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक,जलसुरक्षक,ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.