सालेकसा-दि. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कचारगड यात्रा सुरु होत आहे. सालेकसा तालुक्यात छत्तीसगड ,मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या कचारगडला आदिवासी समाजाचे उगम स्थळ मानले जात असून या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज श्रद्धेने येऊन नमन करून जातो.आद्य पौर्णिमेनिमित्त आपल्या पूर्वजाला नवस फेडण्यासाठी दरवर्षी येथे सुमारे पाच ते सहा लाख भाविक येत असतात.त्या लाखो भाविकांना सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नाने पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असतात.
यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्यविषयक सेवा सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून दि.31 जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे हे प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे पोहचले.वैद्यकिय अधिकारी डॉ.पारस गिरी व आरोग्य संस्थेतील कर्मचारीवर्ग यांच्याशी कचारगड यात्रेदरम्यान आरोग्य सुविधा बाबत चर्चा केली.त्यात प्रामुख्याने पाच दिवस वैद्यकिय टिम यांच्या ड्युटीचे नियोजन करणे,औषधी साठा,आरोग्यविषयक कार्यक्रमे-योजना यांची जनजागृती करुन स्टॉल लावणे,पाणी शुद्धीकरण,जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण,ओटि परिक्षण,प्राथमिक उपचार व साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतची माहिती घेतली.त्यानतंर डॉ.वानखेडे थेट प्रत्यक्ष कचारगड येथील कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थानी पोहचुन जागेची पाहणी केली. त्यावेळे त्यांचे सोबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम,प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पारस गिरी व त्यांचे आरोग्य संस्थेचे आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक उपस्थित होते.