भंडारा: गोसेखुर्द प्रकल्पामुळे अनेक भागात नहाराद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्या जात असल्याने उन्हाळी धानाचे पिक घेण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे. परंतु, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ गोसेखुर्द प्रकल्पाच्या गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या अनियोजीत कारभारामुळे अनेक शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. परिणामी शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागते. अशाच शेतकर्यांनी सोमवारला गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या आंबाडी येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी सबंधीत अधिकार्यांशी चर्चा करुन अधिकार्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या नेरला उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी दिल्या जात असलेल्या लाखांदुर तालुक्यातील पेंढरी (सो.), तिरखुरी, हरदोली, सोनेगाव या भागात उन्हाळी धान पिकाच्या लागवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या धानाच्या नर्सरीसाठी पाण्याची अंत्यंत आवश्यकता असल्याने १ जानेवारी रोजी पाणी सोडण्याची मागणी सबंधीत शेतकर्यांनी केली होती. त्यानुसार सबंधीत अधिकार्यांनी नहराला पाणी सोडले. परंतु, सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचु न देता पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ४०-५० शेतकर्यांनी थेट आंबाडीचे कार्यालय गाठुन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्यांनी संतप्त शेतकर्यांची वैâफियत ऐकुन सिंचनासाठी पाणी सोडुन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही तो पर्यंत पाणी सुरु राहील, असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकर्यांनी आपली आंदोलनात्मक भुमिका मागे घेतली. यावेळी गोपाल रोहनकर, विलास दहेलकर, केशव रोहनकर, प्रदीप शेंडे, भास्कर रोहनकर, नाशिक मेश्राम, गुलाब मेश्राम, दादा रोहनकर, मछिंद्र शेंडे,पुण्यवान मेश्राम, नरेश भोयर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी संतप्त शेतकर्यांनी सांगीतले कि, अधिकारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगतात, पाणीही सोडतात. मात्र सोडलेला पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचु देत नाही आणि नहराचे पाणी बंद करतात. यामुळे शेतकर्यांना पिकाच्या नुकसानीला पुढे जावे लागत असल्याचे पेंढरी (सो.) येथील शेतकरी गोपाल रोहनकर यांनी सांगीतले.
पेंढरी (सो.), तिरखुरी, हरदोली, सोनेगाव या भागातील शेतकरी नेरला उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या भरवशावर उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. दोन दिवसापुर्वी सदर भागातील शेतकर्यांसाठी पाणी सोडण्यात आले. मात्र पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचु न देता पाणी बंद करण्यात आले. यामुळे जवळपास १०० एकरातील धान पिक धोक्यात आले असल्याचे संतप्त शेतकर्यांनी सांगीतले.