- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक
गोंदिया, दि.3 : गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. या जिल्ह्यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्हा विकास निधी वाढवून देण्यात येणार. यासोबतच अंमलबजावणी यंत्रणांनी रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे आज (ता.3) घेण्यात आली. या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच गोंदिया येथून जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीची मागणी लक्षात घेता, सर्वसाधारण योजनेत निश्चितपणे निधी वाढवून दिला जाईल. मात्र सदर निधी जिल्ह्याच्या विकास कामांवर खर्च करण्यात यावा. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अंमलबजावणी यंत्रणांनी दिलेल्या निधीचा योग्य कामांसाठी वापर होईल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे सौरीकरण (सौर ऊर्जेवर) करण्यात यावे असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. चालु आर्थिक वर्षातील संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यात यावा. निधी वितरीत करतांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे यादृष्टीने कुशल कामे करुन योजनांची प्रभावीपणे अंमलबजाणी करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्याच्या विकास कामांसाठी विशेषत: शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, क्रीडा विभाग तसेच अपारंपारिक ऊर्जा यावर निधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली.