अर्जुनी-मोर.दि.८ फेब्रुवारी: अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने ता.7 रोजी आरोग्य उपसंचालक नागपूर कार्यालयात आमदार राजकुमार बडोले यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
ही बैठक उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा शशिकांत शंभरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी सभापती मनोज बोपचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, एनआरएचएम जिल्हा कार्यक्रम अधिकारी वानखेडे, उपअभियंता पवन फुंडे, उपअभियंता निमजे, तसेच अर्जुनी मोर. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गेडाम उपस्थित होते.
या बैठकीत अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अर्जुनी मोर व सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांच्यातील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा झाली.
यामधे आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांच्या इमारतींची स्थिती व दुरुस्तीबाबत आढावा.,ग्रामीण रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे, डॉक्टर व इतर कर्मचारी यांची सद्यस्थिती., रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया, त्यांच्या आवश्यक सुविधांचा आढावा, बाह्यसेवा कर्मचारी व इतर सहाय्यक सेवांचे नियोजन,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा,औषधांचा पुरवठा आणि त्याचा साठा याबाबत समीक्षा, गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, रेफर केलेले रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण याचा आढावा,महत्त्वपूर्ण निर्णय आणि आगामी कार्यवाही,याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात येत असल्याने आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने आमदार राजकुमार बडोले यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.