नागपूर : कला शाखेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे मत माजी विभागीय आयुक्त प्रो अनुप कुमार यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत ॲडव्हांटेज विदर्भ २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सिनेट हॉलमध्ये ‘कला शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराचा संधी’ या विषयावर शनिवार, दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून प्रो.अनुप कुमार बोलत होते.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भात उद्योगांना चालना मिळत युवकांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने ॲडव्हांटेज विदर्भचे आयोजन करण्यात आले आहे. माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले. प्रमुख वक्ता म्हणून माजी विभागीय आयुक्त प्रो. अनुप कुमार, सौ. अल्पना देशपांडे, विद्यापीठाचे राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांची उपस्थिती होती. वर्तमानातील शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रो. अनुप कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य निर्माण व्हावे. त्यातून रोजगार आणि उद्योग प्रधान नागरिक निर्माण व्हावा, अशी शिक्षण प्रणाली विकसित करावी. संगणकाच्या युगात रोजगाराच्या अनेक संज्ञा उपलब्ध आहेत. त्यांना संचालित करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा प्रो. अनुप कुमार माजी विभागीय आयुक्त यांनी व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना त्यांनी देशाच्या प्रशासकीय सेवेत सर्वात जास्त कला शाखेचे विद्यार्थी सेवा देतात तसेच त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा अनुभव सांगताना इतर शाखांपेक्षा कला शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा जास्त असतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः मधील क्षमता ओळखून आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्राची निवड करावी आणि सतत आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करून निश्चित केलेले ध्येय प्राप्त करावे. कला शाखेच्या विविध विषयांच्या अभ्यासातून जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण होतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी कला शाखा घेऊन विविध परीक्षा उत्तीर्ण करतात. घेतलेले शिक्षण आणि स्वतःमधील कौशल्य याचा योग्य समन्वय करून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय किंवा योग्य नोकरी मिळवावी, असे ते म्हणाले. भारताच्या उच्च शिक्षणाचा आढावा घेतल्यास असे निदर्शनास आले की ६० टक्के विद्यार्थी कला शाखेचे शिक्षण घेतात. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे वर्तमानातील शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दुसऱ्या वक्त्या सौ. अल्पना देशपांडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी जीवनात आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. तसेच आत्मविश्वास हे आपले शस्त्र आहे असे सांगितले. स्पर्धेच्या युगात काळाची गरज ओळखून प्रत्येकाने आपले आवडते क्षेत्र निवडून त्यात काम करावे. निवडलेले क्षेत्र महत्त्वाचे असते. आपण घेतलेले शिक्षण आणि शिक्षणातून निर्माण होणारे कौशल्य यांचा योग्य समन्वय साधून यशस्वीतिकडे वाटचाल करू शकतो. याशिवाय त्यांनी विदर्भ शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या पुढारलेला आहे. यापुढेही विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग प्रस्थापित होईल आणि यातून रोजगार उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी जीवनात आणि पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक बंधने जपली पाहिजे. वर्तमान काळात जे आपण शिक्षण घेत आहोत त्याचा भविष्यात कुठे ना कुठे फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मानव व विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्यामराव कोरेटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कला शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमकुवत समजण्याची गरज नाही, असे सांगितले. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुणांना योग्य चालना दिल्यास त्यांचे भविष्य उज्वल आहे. उपलब्ध असलेल्या रोजगाराला आपण कसे पात्र आहोत हे सिद्ध करावे. याकरिता स्वतःमधील कौशल्य विकसित करावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला समाज विज्ञान शाखेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.