कोल्हापूर,दि.०९ः नुकतेच स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. निकाल नजरेखालून घातला आणि मला खूप – खूप आश्चर्य वाटले.साहित्य आणि संस्कृती मंडळ हे सत्य, न्याय आणि निष्ठा यापासून दूर जात असून मंडळात राजकारण आणि धर्मकारण प्रवेशले असल्याचे दिसून येत आहे.सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत; मात्र केवळ एक – दोन बाबी वानगीदाखल आपल्या निदर्शनास आणत असून आपण समजदार व प्रामाणिक आहात तेव्हा त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून आम्हास त्याबाबत त्वरित अवगत करावे असे डॉ. सुनील दादा पाटील यांनी पत्रकातून म्हटले आहे.
प्रौढ वाङ्मय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा दस्तावेज या कादंबरीस जाहीर झाला. सदर निकालानुसार ०१ जानेवारी २०२३ पासून ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेले पुस्तक स्वीकृत होणे अपेक्षित असताना आणि माझ्याकडे दस्तावेज या कादंबरीची जी छापील प्रत आहे त्यावर पुस्तक प्रकाशनाची कोणतीही तारीख छापलेली नाही. याचा अर्थ या पुरस्कारासाठी ज्या कालावधीत पुस्तक प्रसिद्ध होणे अपेक्षित होते त्या कालावधीत ते प्रसिद्ध झालेले नाही. सदर पुस्तकावर प्रकाशनाची कोणतीही तारीख छापलेली नाही; तेव्हा सदर पुस्तक अपात्र असताना स्पर्धेसाठी कसे दाखल झाले? ही एक अक्षम्य चूक असून अशा अपात्र पुस्तकास पुरस्कार जाहीर करणे ही दुसरी घोडचूक आहे.
पुस्तक दाखल करताना साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संबंधित व्यक्तींनी त्याची प्रकाशनाची तारीख तपासणे आवश्यक असताना अत्यंत निष्काळजीपणे सदर पुस्तक समीक्षकांच्याकडे पाठवले ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडील आहे. यामधून निश्चितच कोणाचे तरी हित जपण्याचा प्रकार झाला आहे.
सदर पुस्तकावर प्रकाशनाची तारीख म्हणजेच दिवस, महिना आणि वर्ष छापणे अपेक्षित असताना केवळ पहिली आवृत्ती हक्क: २०२२ असे छापले. त्यावर दुसरी कडी करून २०२२ मिटवण्यासाठी २०२३ चे स्टीकर लावले. पहिली आवृत्ती हक्क: २०२२ म्हणजे प्रकाशनाची तारीख नव्हे. तर सदर पुस्तकावर प्रकाशनाची तारीख प्रसिद्ध केलेलीच नाही. सबब ०१ जानेवारी २०२३ पासून ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांसाठी असलेला पुरस्कार जाहीर करून अपात्र पुस्तकाला पुरस्कार जाहीर करून मंडळ कोणते हित साधत आहे?
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नियमावलीतील पहिला आणि महत्त्वाचा कालावधीचा नियम सदर पुस्तकासाठी पाळलेला नाही. सबब जाहीर करण्यात आलेला पुरस्कार अनधिकृत आणि नियमबाह्य ठरला असून सदर निकालात तशी तात्काळ दुरूस्ती करावी.
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नियमावलीतील आठवा आणि महत्वाचा नियम अर्थात पुस्तकात प्रकाशन दिनांक, वर्ष, प्रथम आवृत्ती छापलेले असणे आवश्यक आहे. तारखेचा, वर्षाचा व आवृत्तीचा रबरी शिक्का अथवा चिकटवलेली पट्टी ग्राह्य धरण्यात येणार नाही. असे असतानासुद्धा पुस्तक ग्राह्य धरण्यात आले आहे आणि त्याची पुरस्कारासाठी निवड झाली हे सर्वच नियमबाह्य आहे; यास्तव योग्य ती कार्यवाही करून आम्हाला सूचित करावे.
अन्यथा आमच्यासारख्या लेखक – प्रकाशकांनी यापूर्वी प्रकाशित झालेल्या जुन्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या तारखेवर आम्हाला हवे ते प्रकाशन वर्ष आणि आम्हाला हवी ती आवृत्ती इत्यादीचे स्टीकर लावून स्पर्धेत पाठवले तर साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा प्रकारची पुस्तके भविष्यात स्वीकृत करणार का?
एक लेखक आणि प्रकाशक या नात्याने घडलेला प्रकार निंदनीय आणि गलथान कारभाराचा असून सत्य आणि न्यायाचा नाही. निरपेक्षपणे सदर निकाल जाहीर झालेले नाहीत. यामुळे साहित्य आणि संस्कृती मंडळाची विश्वासाहर्ता दिवसेंदिवस कमी होत असून साहित्य आणि संस्कृती मंडळ अनेक वाद – विवादात अडकत चालले असून आपल्या ध्येय – धोरणापासून दूर जात आहे. वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. आपण सुज्ञ आणि समजदार आहात आपणास जास्त सांगणे न लागे.
मागील वर्षी अर्थात २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून ८५ प्रस्ताव लेखक – प्रकाशक यांनी दाखल केले. मात्र इसवी सन २०२५ मध्ये या प्रस्तावाची संख्या निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे. याचे मूळ कारण म्हणजे साहित्य आणि संस्कृती मंडळाची अनास्था आणि तेथील अनागोंदी कारभार हेच आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धंनासाठी सुरू असलेल्या योजना बंद पाडण्याचा डाव वेळीच हाणून पाडणे गरजेचे आहे.
ज्या पुस्तकांची – संस्थांची – व्यक्तिची पुरस्कारासाठी निवड केली जाते ती व्यक्ती – संस्था त्या क्षमतेची आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. योग्य तो अनुभव – गुण – क्षमता नसतानाही काही लोकांची – संस्थांची – पुस्तकाची निवड का केली जाते हा यक्ष प्रश्न आहे.