गोंदिया, दि.12 : कचारगड हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. देशाच्या अनेक राज्यातून दरवर्षी या ठिकाणी भाविक येथे येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा. कचारगडच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली.
राष्ट्रीय स्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन तथा कोया पुनेम निमीत्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड येथे 10 फेब्रुवारीपासून पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली पेनठाना देवस्थान कचारगड यात्रा सुरु झाली असून येथील सांस्कृतिक भवन येथे आज (ता.12) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके, माजी केंद्रीय मंत्री फगनसिंह कुलस्ते, खासदार सर्वश्री डॉ.नामदेव किरसान, भोजराज नाग, महेंद्र कश्यप, आमदार सर्वश्री संजय पुराम, डॉ.परिणय फुके, रामदास मसराम, नामदेव उसेंडी, माजी खासदार अशोक नेते, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, माजी आमदार भैरसिंह नागपुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कचारगड यात्रेची परंपरा खुप मोठी आहे. या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात येतात. मी महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री आहे, मला या ठिकाणी येऊन आशिर्वाद व दर्शनाचा लाभ घेता आला. या ठिकाणी मिळालेली आशिर्वादरुपी ऊर्जा आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रेरणा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन आदिवासी समाजाने केले आहे. या समाजाच्या प्राचिन अशा संस्कृतीचे जतन करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. देशातील विविधता, सामाजिक समृध्दी आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भर देणार आहे. सरकार गोंडी आदिवासी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून गोंडी संस्कृतीचे निश्चितच जतन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. स्थानिकांची गरज लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या हाताला काम देण्यात येईल. वन हक्क जमीन पट्टयांपासून आदिवासी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रत्येक आदिवासी महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कचारगडचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके म्हणाले, कचारगड हे एक पवित्र स्थळ असून येथे आल्यावर व्यक्तीमध्ये चेतना जागृत होतात. ज्या भागात समाज एकजुट राहतो तिथे विकासाच्या नविन दिशा निर्माण होतात. या समाजातील लोकांना कितीही भाषा बोलता येत असल्या तरी गोंडी बोलीभाषा आदिवासी समाजातील बांधवांना आली पाहिजे. कारण गोंडी भाषा ही गोंडवाना समाजाचा गौरवशाली वैभव आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार रामदास मसराम, माजी केंद्रीय मंत्री फगनसिंह कुलस्ते, खासदार भोजराज नाग, आमदार संजय पुराम, माजी खासदार अशोक नेते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आदिवासी बांधवांच्या परिवारासाठी आरोग्याचा उपचार व्हावा यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मोतियाबिंदू, किडनीचे व पोटाचे आजार, मेंदूचे आजार व इतर दुर्धर आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार व प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या असून त्याचा लाभ बहुसंख्य भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि.प.समाज कल्याण सभापती रजनताई नागपुरे, पंचायत समिती सभापती गोंदिया मुनेश्वर रहांगडाले, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, प्रकल्प अधिकारी गोंदिया उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी चंद्रपूर विकास राचेलवार, उविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, तहसिलदार सालेकसा नरसय्या कोंडागुर्ले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, नगरपंचायत मुख्याधिकारी देवरी संजय उईके, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांचेसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कचारगड सेवा समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. सुत्रसंचालन भरत मडावी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आमदार संजय पुराम यांनी मानले.