• अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्षांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
गोंदिया, दि.16 : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील शेतशिवारात 9 फेब्रुवारी 2025 रोजी अनुसूचित जातीच्या बौध्द समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन जाळून मारण्याची घडलेली घटना ही अत्यंत अमानवीय व मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. तसेच अशा विकृत मानसिकतेच्या त्या आरोपीला कायद्यान्वये कठोरातील कठोर दंड देण्याचे प्रतिपादन राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
आज (ता.16) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना धर्मपाल मेश्राम म्हणाले की, अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जाती प्रवर्गाची असून बौध्द समाजाची आहे. आरोपी शकील मुश्ताक सिध्दीकी हा विकृत मानसिकतेचा असून त्याच्या विरोधात आरोपपत्र तयार करुन त्याला जामीन मिळू नये असे पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांना निर्देशीत केले असल्याचे ते म्हणाले. आज आमगाव तालुक्यातील सदर मृत अल्पवयीन मुलीच्या स्वगावी मानेकसा येथे जाऊन पालक व कुटूंबियांची सांत्वना भेट घेतली. अत्यंत गरीब असलेले हे कुटूंब उदरनिर्वाहसाठी जवळपास 40 कि.मी. अंतरावरील गोरेगाव तालुक्यातील विटभट्टीवर मोलमजुरीचे काम करीत होते. दरम्यान त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन मानुसकीला लाजविणारे कृत्य त्या आरोपीने केले. तसेच तिच्या पोटात 7 महिन्याचे गर्भ असतांना जीवंत जाळून विकृत मानसिकतेच्या त्या व्यक्तीने निर्घून खुन केले. अशा आरोपीला सुरक्षीत समाजाच्या दृष्टीने समाजात वावरण्याचे हक्क नाही. त्यामुळे पोलीस विभागाने आरोपीच्या विरोधात सर्व कठोर कलमे लावून कायदेशीर कारवाईचे निर्देश आजच्या बैठकीत दिले आहेत. या बैठकीत महसूल विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण, पोलीस विभाग, सामाजिक न्याय विभाग आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
संबंधित विभागाकडून माहिती घेतली असता, जिल्ह्यात अनेक अनाधिकृत विटभट्टया सुरु असल्याची माहिती मिळाली. या अनाधिकृत विटभट्ट्यांची कायदेशीर प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तपासावी असेही त्यांनी निर्देशीत केल्याचे सांगितले. गोंदिया जिल्ह्यात किती बाल कामगार काम करीत आहेत, यासंदर्भातील सर्वेक्षणाची माहिती तात्काळ अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सादर करावे असेही निर्देशीत केले आहे. या प्रकरणी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यावर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. मेश्राम पुढे बोलतांना म्हणाले की, 9 फेब्रुवारी रोजी मुलीचे आई-वडील रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गेले असता योग्य ते सहकार्य मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रावणवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारणे विचारण्यात येतील. चर्चेदरम्यान सदर मुलीच्या कुटूंबियांनी सांगितले की, त्या आरोपीने मुलीला दोन-तीन डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणीकरीता नेले होते. अशा अनाधिकृतपणे वैद्यकीय तपासणी करणाऱ्या चिकित्सकांचीही योग्य ती चौकशी करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी गोंदिया यांना येत्या तीन दिवसात सदर कुटूंबाला जातीचा दाखला तयार करुन देण्याचे निर्देशीत केले आहे. तसेच समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना तात्काळ प्रभावाने सदर कुटूंबाला मदत देण्याचे निर्देशीत केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.