जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2024 पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

0
34

गोंदिया 18 :-जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2024 या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज विमोचन करण्यात आले.  जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गोंदिया उपसंचालक सुनील धोंगडे यांनी सदर पुस्तिका सादर केली. ही पुस्तिका अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदर पुस्तिकेत एकूण अकरा प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणात जिल्ह्यातील विविध विषयांवरील विस्तृत आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडक निर्देशक, जिल्हा उत्पन्न अंदाज, जिल्ह्यातील किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न/ खर्च, बॅंक व विमा, बचतगट, कृषिविषयक आकडेवारी, जिल्ह्यातील जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, पणन, वस्त्रोद्योग बाबत आकडेवारी, पायाभूत सुविधांमध्ये उर्जा,  प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम पाणि पुरवठा व स्वच्छता विषयक माहिती. सामाजिक क्षेत्रे व सामूहिक सेवा अंतर्गत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, मदत व पुनर्वसन विषयीची माहिती व आकडेवारी. योजनांविषयी आकडेवारी मध्ये विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना बाबतची आकडेवारी. संकीर्ण मध्ये न्याय व प्रशासन, माहिती व जनसंपर्क, निवडणुकीबाबत, वित्त, पर्यटन बाबत आकडेवारी, शेवटच्या विभागात जनगणना, कृषी गणना, पशु गणना व आर्थिक गणनेबाबतची आकडेवारी उपलब्ध आहे.

सदर पुस्तिकेचा उपयोग विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य जनतेला निश्चितच होईल अशी अपेक्षा आहे.