- शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचा आढावा
गोंदिया, दि.18 : शासन राबवित असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन लोकाभिमुख कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रशासनाची व संबंधित विभागाची असल्याने शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाने कुशल कामे करावीत, असे निर्देश गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.18) शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जि.प.सभापती लक्ष्मण भगत, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन यशस्वीपणे राबवा. ‘पीएम श्री शाळा’ योजनेत गोंदिया जिल्ह्यात 20 शाळा असून यावर Human Resource Development यावर खर्च झालेला आहे. यामुळे शाळांची पटसंख्या वाढलेली आहे. सदर 20 शाळांचे विकासात्मक अंकेक्षण (ऑडिट) करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी शिक्षण विभागाला दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार ‘पीएम श्री शाळा’ उपक्रमाच्या धर्तीवर ‘सीएम श्री शाळा’ उपक्रम सुरु करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
राज्यात 478 शाळेत ‘आदर्श शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण 1642 शाळा असून ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 9 छोट्या व 9 मोठ्या शाळांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या शाळांचे सुध्दा विकासात्मक अंकेक्षण (ऑडिट) करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
गोंदिया जिल्ह्यात 290 विविध कार्यकारी सहकारी संस्था असून 39 आदिवासी सहकारी संस्था आहेत. जिल्ह्यात अशा एकूण 329 सहकारी संस्था आहेत. त्यापैकी 121 सहकारी संस्थांचे संगणकीकरण झाले आहे. हे आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष आहे. याअंतर्गत 12 कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात एकूण 33 रेती/वाळूचे घाट आहेत. रेती चोरी संदर्भातील अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेची जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात यावी असे सांगून ते म्हणाले की, जंगली जनावरांमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वन विभागाने लवकरात लवकर सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शिक्षण विभागांतर्गत शाळा, शिक्षक व विद्यार्थी, जिल्हा परिषद शिक्षक स्थिती, विद्यार्थी अपार आयडी बाबत स्थिती, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, पीएम श्री योजना, दप्तरमुक्त शनिवार, अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा बांधकाम, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एक मॉडेल स्कुल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकसीत करणे, प्रथम संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील शाळांचा गुणवत्ता विकास, जिल्ह्यात कार्यरत असेलेले प्रमुख खनिज व गौण खनिज खाणपट्टे, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणे, जिल्हा खनिज प्रतिष्ठान बाबत सद्यस्थिती, जिल्ह्यातील रेती/वाळू डेपोची सद्यस्थिती आदींबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली.
सभेला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी रविंद्र मारबते व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.