गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पोलीस परिवारांसोबत साधला संवाद

0
52

गोंदिया, दि.18 : पोलीस मुख्यालय कारंजा (गोंदिया) येथील प्रेरणा सभागृहात आज (ता.18) गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “पोलीस परिवारांसोबत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी म्हणाले की, पोलीस हा शासनाचा महत्वपूर्ण विभाग असून तो 24 तास तत्परतेने सेवा देत असतो. पोलीस प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल करून कर्मचाऱ्यांची पदोन्न्ती देण्यात यावी. नव्या पोलीस वसाहती निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी आपले कर्तव्य (ड्युटी) बजावतांना त्रास होऊ नये याकरीता दक्षता केंद्रांची स्थापना करण्यात यावी. शासनाचा प्रतिनीधी म्हणून पोलीस बांधवांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या मागण्या एैकून घेणे व पाठपुरावा करणे या हेतूने “पोलीस परिवारांसोबत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 “पोलीस परिवारांसोबत संवाद” कार्यक्रमामध्ये गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानार्थ प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी मानले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.