शेतावर महिला मजुरांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

0
53

अर्जुनी-मोर.– संपूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला गावातील महिला मजुरांनी शेतावरच शिवजयंती साजरी करून एक अनोखा आदर्श निर्माण केला.चिंतामण तरोने यांच्या शेतात धान रोवणीच्या कामात व्यग्र असलेल्या महिला मजुरांनी शेतावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून शिवजयंती साजरी केली. शेतमजुरीच्या कामामुळे गावातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी होण्यास असमर्थ असलेल्या या महिलांनी आपला आनंद शेतातच साजरा करत महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

या विशेष सोहळ्यात पुरुषोत्तम बावनकर, कीर्ती बावनकर, दिगंबर सोनवणे, चैतन्य येरणे, आनंद तरोणे यांच्यासह सर्व महिला मजूर सहभागी झाले होते. शेतावर साजऱ्या झालेल्या या आगळ्यावेगळ्या शिवजयंतीमुळे मजुरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या उपक्रमामुळे मेहनतीने कष्ट करणाऱ्या महिला मजुरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा संदेश दिला. शेतावर साजऱ्या झालेल्या या उत्सवाने शिवप्रेमाचा एक वेगळाच आनंद अनुभवता आला, असे भावना महिलांनी व्यक्त केल्या.