बुलढाणा : लोकार्पण झाल्यापासून अपघाताने गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. आज गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील दुसरबीड (तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा )येथे ही भीषण दुर्घटना घडली.या भीषण अपघाताचा विस्त्तृत तपशील अद्याप मिळाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार चारचाकी प्रवासी वाहनाने अचानक पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात दोन जणांचा होरपळून करूण अंत झाला. तिसरा प्रवासी गंभीर रित्या जखमी झाला आहे. पोलीस, महामार्ग पोलीस, विशेष रुग्णवाहिका, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. हे चारचाकी वाहन मुंबई येथून अकोलाकडे जात होते. वाहनाने अचानक पेट घेतला आणि मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या शेतातील गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत लिहिस्तोवर कार विझविण्यात आली असून समृद्धी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.