डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने जाहीर सत्कार

0
272

नागपूर,दि.२२ः पाचवे अखिल भारतीय पवारी साहित्य संमेलन, कारंजा (घाडगे) जिल्हा वर्धा, १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, पूर्व प्राध्यापक, विभागप्रमुख व अधिष्ठाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना पवारी बोली-भाषाचे सृजन – संवर्धन कार्यात अमूल्य योगदान प्रित्यर्थ “जीवन गौरव पुरस्कार” वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.सरिता गाखरे यांच्या हस्ते देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे उपाध्यक्ष डॉ मोतीलाल चौधरी, सत्कारमुर्ती डॉ ज्ञानेश्वर टेंभरे,जेष्ठ साहित्यिक व अध्यक्ष पवारी साहित्य कला संस्कृती मंडळ एड. लखनसिंह कटरे,पृथ्वीराज रहांगडाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पवार नावाच्या जातिचे लोक महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रात गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा तसेच मध्यप्रदेशातील महाकौशल क्षेत्रात बालाघाट, सिवनी, छिंदवाडा आणि बैतुल या जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिढ्यांपिढया निवास करीत असून त्यांचा मुळ व्यवसाय शेती आहे. नवीन पिढीचे लोक मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसाय व उद्योग क्षेत्रांशी जुळून शहरांत स्थानांतरित होत आहेत. या समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या भागात पंवार, पोवार किंवा भोयर-पवार या नावाने सुध्दा ओळखले जाते. त्यांची आपली मातृभाषा पवारी (पोवारी, भोयरी) बोली आहे. उपलब्ध जिल्हा राजपत्र (गॅजेट) आणि ग्रंथांमध्ये दिलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार पवार लोक हे मूळचे माळव्यातील परमार होत व मुस्लीम शासकांच्या अमानवीय अत्याचारापासून सुटका करण्याच्या हेतुने या प्रदेशात स्थानांतरित झाले आणि गोंड व मराठा राज्यकाळात सैन्य आणि कृषी क्षेत्रात आपले प्राविण्य प्रस्थापित करुन इथेच स्थायिक झाले. त्यांनी या प्रदेशामध्ये आपल्या सोबत आपली मातृभाषा पवारी पण आणली. ही बोली माळवी, बुंदेली, राजस्थानी, मराठी, हिंदी भाषांचे अनोखे मिश्रण दर्शविते व स्थानीय हलबी-कोष्टी बोलीशी मिळती-जुळती आहे.

भारतीय जनगणना संलग्न भाषा सर्वेक्षण यादी तसेच मराठी विश्वकोश मध्ये पवारी बोलीची अधिकृत नोंदणी बघायला मिळते. पवारी बोलीचा भाषा कोड pwr ISO 639-3 आणि तिची वर्तमान स्थिती EGIDS-6-B-9 अशी असुरक्षित (endangered) अवस्थेची नोंद आहे. कारण की वर्तमान काळात जवळपास १०-२०% लोकसंख्यक पवारजनच आपली मातृभाषा बोलतात.मागिल अर्धशतकात (१९७४ – २०२४) पवारी बोलीवर संशोधन करुन पांच – सहा संशोधकांनी विविध विद्यापीठांमधून आचार्य पदवी मिळवली आहे.

सद्य:स्थितीत पवारी बोलीभाषा ही अत्यंत दयनीय अवस्थेत वाटचाल करीत आहे. पवार समाजातील मागील तीन-चार पिढीच्या लोकांनी मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊन आपल्या मातृभाषेचा घरी – बाहेर पूर्णपणे त्याग करत एकाध्या शैक्षणिक भाषेचा उपयोग करीत आहेत. याचा दुष्परिणाम होत त्यांच्या मातृभाषेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे.

पवारी बोली ही मूळत: ‘कथित भाषा’ आहे व तिचे संवर्धन करण्यासाठी ‘लिखित भाषा’ रुपांतर करणे गरजेचे आहे. पवारी भाषेचे जतन करावयाचे असल्यास तिचा दैनंदिनी आपसात उपयोग, प्रचार-प्रसार तसेच विविध गद्य, पद्य साहित्य निर्माण इत्यादी प्राथमिक स्वरूपाचे कार्य करणे आवश्यक आहे. या उद्येशपूर्तीकरीता डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे यानी पुढाकार घेऊन पवारी बोली सृजन, संवर्धन करीता एक सशक्त व्यासपीठ प्रदान करण्यासाठी “राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृति मंडळ” ची दिनांक ०४ नोव्हेंबर २०१८ ला स्थापना केली. या मंडळाद्वारे दरवर्षी अखिल भारतीय पवारी साहित्य सम्मेलनांचे आयोजन, परिचर्चा, कवि सम्मेलन आणि ‘पवारी साहित्य सरिता’ नामक वार्षिक स्मरणीकेचे प्रकाशन इत्यादी उपक्रम राबविले जातात. आतापर्यंत पाच सम्मेलने आणि ‘पवारी साहित्य सरिता’चे सहा अंक प्रकाशित झालेले आहेत. प्रत्येक अंकात ३५-४० लेख आणि ८०-१०० काव्य रचना प्रकाशित होत असतात. प्रत्येक अधिवेशनामध्ये काव्य-रत्न, लेख-रत्न, कला-रत्न, गायक-रत्न, जीवन गौरव इत्यादी पुरस्कार दिले जातात. महत्वाची बाब म्हणजे दर सम्मेलनात नव-प्रकाशित पवारी बोलीच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात येत असते. आजपर्यंत पवारी बोली ची काव्य संग्रह, कथा संग्रह, लेख संग्रह इत्यादी ३०-३५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी स्वतः खालील पुस्तकें प्रकाशित केलेली आहेत –
(१) पवारी ज्ञानदीप – पवारी भाषा विज्ञान, लोकसाहित्य आणि शब्दकोश (२०११),
(२) गूंज उठे पवारी – काव्य संग्रह (२०१७),
(३) दुर्वांकुर – कथा संग्रह (२०१९),
(४) बुलंद करो पवारी – काव्य संग्रह (२०२०),
(५) मोरो काव्य छंद – काव्य संग्रह (२०२१),
(६) पवारी सरित् सागर – संस्मरण, कथा, लेख संग्रह (२०२२),
(७) मोरो गाव गूंजे पवारी – लोकगीत + लोककथा संग्रह (२०२३) आणि
(८) पवारी लोकसाहित्य – साहित्य अकादमी (प्रकाशनाधिन).

त्यांनी वरील पुस्तकांबरोबर खालील चार संशोधन पत्रें विविध नामवंत साहित्य पत्रिकांमध्ये प्रकाशित केलेली आहेत –
(१) पोवारी बोली चे स्वरूप, युगवाणी, विदर्भ साहित्य संघ नागपुर त्रैमासिक (२०२०),
(२) पोवारी बोली ही बुंदेलीची उपभाषा, प्रतिष्ठान, मराठवाड़ा मराठी परिषद, छत्रपति संभाजीनगर त्रैमासिक (२०२२),
(३) शिक्षाविदों के विहंगम दृष्टि में पवारी/पोवारी बोली, हिंदुस्तानी भाषा भारती, हिंदुस्तानी भाषा अकेदमी दिल्ली त्रैमासिक (२०२३) आणि
(४) पवारी बोली : इतिहास, वर्तमान तथा भविष्य, हिंदुस्तानी भाषा भारती, हिंदुस्तानी भाषा अकेदमी दिल्ली त्रैमासिक (२०२४).
हिमालया पब्लिशिंग हाऊस, मुंबई द्वारा त्यांचे नुकतेच प्रकाशित पुस्तक ‘पवार समाज इतिहास’ (२०२५) मध्ये त्यांनी पवारी बोली सृजन-संवर्धन वर विस्तृत माहिती दिली आहे. या पुस्तकाचेपण ह्याच सम्मेलनात प्रकाशन होणार आहे.

डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे पवारी साहित्य सरिता वार्षिक स्मरणिकाचे आतापर्यंत प्रकाशित सहा अंक (२०१९ ते २०२५) चे मुख्य संपादक आहेत.डॉ. ज्ञानेश्वर टेंभरेंनी, स्नातकोत्तर प्राणिशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधून प्राध्यापक, विभागप्रमुख, विज्ञान अधिष्ठाता पदावरुन २००४ ला सेवानिवृत्तीनंतर आपले पुढचे आयुष्य पवारी बोली सृजन, संवर्धन आणि साहित्य निर्मिती साठी समर्पित केले. त्यांच्या या अलौकिक मौलिक कामगिरी बद्दल पाचव्या अखिल भारतीय पवारी साहित्य संमेलन, कारंजा (घाडगे) जिल्हा वर्धा, मध्ये ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.