गोंदिया जिल्ह्याला एका क्लिकवर मंजूर होणार ३४ हजार ६३ घरकुल

0
2504

गोंदिया,दि.२२ः- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर ३४ हजार ६३ घरकुल मंजुरीचे पत्र वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक यांनी दिली.या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज शनिवारी (दि. २२) पुणे येथील बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळी गोंदिया येथे ३४ हजार ६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश- पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

शनिवारी (दि. २२) पुणे येथील बालेवाडी येथे होत असलेल्या या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सभागृहात, प्रत्येक पंचायत समितीच्या सभागृहात व राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ३४ हजार ६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते २३ हजार ३५३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत असून, राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर हप्ते वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक जानेवारी २०२५ पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून आपल्या हक्काचे घर मिळवावे. आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून गावकऱ्यांच्या हितांचे प्रश्न लोकप्रति निधींच्या समक्ष ठेवावे जेणेकरुन गावातील समस्या सोडविणे सहज शक्य होईल व गावाचा विकास करता येईल.

गोंदिया जिल्ह्यातंर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याने टप्पा 1 मध्ये ९४२०७ घ्लाभार्थ्यांना घरकूले बांधून देऊन जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकांचा मानकारी ठरलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याला ४५८०२ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट प्राप्त असून त्यापैकी ४४२५८ घरकूलांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे. २२ फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्हयातील ३४ हजार ६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात येत आहे. तसेच २३ हजार ३५३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण होत आहे. रमाई आवास योजना १४०५८ च्या उद्दिष्टयापैकी १०८११ घरकूलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेला आहे. तसेच शबरी आवास योजनेतर्गत ५५९९ घरकूलांच्या उ द्दिष्टांपैकी ४७६० घरकूलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यात मोदी आवास योजनेतंर्गत १३४१० लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूण करण्यात जिल्ह्याचा हातभार लागलेले आहे. या शिवाय जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योज, अहिल्यादेवी हेळकर आवास योजना अंतर्गतही घरकुल बांधकामाव्दारे गरजूंना घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

लाभार्थ्यांना आणखी तीन लाभ मिळणारः
म. गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेतून 90 दिवसाच्या मजुरीचा लाभ देण्यात येणार आहे. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला नाही अशा घरकुल धारकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. तसेच पं. दीनदयाल उपाध्याय योजनेतून 1 लाख रुपये जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.
या सर्व योजनांचा घरकुल लाभाथ्यर्थ्यांना वेळेवर लाभ देऊन लाभार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा शासन प्रयत्न करीत करीत आहे. आपल्याला मंजूर झालेल्या घरकुलामुळे आपल्या सर्व लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे मी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या सर्वांचे अभिनंदन करीत असल्याचे सहकारमंत्री व पालकमंंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.