मार्कंडेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई करा

0
11

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील उत्तरवाहिणी वैनगंगा नदीच्या तीरावर हजारो वर्षाची आदर्श संस्कृती दर्शवित उच्च कोटीचे शिल्प असलेले भगवान मार्कंन्डेश्र्वराचे भव्य ऎतिहासिक मंदिर पुरातत्व विभागाने पुनर्बांधणीसाठी उघडून ठेवले. पण प्रत्यक्षात जिर्णोद्धाराचे काम 10 वर्षांपासून संथगतीने सुरू असल्यामुळे भाविकांची निराशा होत आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यामार्फत हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी काशिनाथ भडके यांनी शासनाकडे केली आहे.

मार्कंन्डादेव मंदिर उत्तर भारतातील प्रसिद्ध “नागरा” शैलीतील असून विदर्भाचे खजिराहो तथा विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय संविधानाने कलम 49 अन्वये जागतिक कीर्तीची वास्तुशिल्पे, मंदिरे, दुर्ग, गडकिल्ले यांच्या संरक्षणाची व ऎतिहासिक वारसा जपण्याची कायदेशीर जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाची आहे. सन 2015 मध्ये मार्कंन्डादेव मंदिराच्या भिंतींना तडा जात असल्याचे लक्षात येताच पुरातत्व विभागाच्या उच्चस्तरीय समितीने 21 फेब्रुवारी 2015 ला मंदिर परिसराची पाहणी करून गर्भगृहासह मंदिराचा व तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा शासनास सादर केला.

महाराष्ट्र राज्याच्या माजी वजनदार मंत्र्यांनी मंदिर जीर्णोव्दाराच्या कामाचे भूमिपुजन करताना हे संपूर्ण काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन भक्तगणांना दिले होते. पुरातत्व विभागाने मंदिरावरिल कोरीव मूर्ती खाली उतरवून सन 2016 पासून जीर्णोव्दाराच्या कामास सुरूवात केली. पण गेल्या 10 वर्षापासून भक्तगणांना भग्नावस्थेतील मंदिरात जाऊन पूजाअर्चा करावी लागत आहे.

मार्कंन्डादेव ट्रस्टचे पदाधिकारी नागपूर, मुंबई, दिल्लीत मंत्री, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनास भेटून भग्न मंदिराचे काम पूर्ण करण्यास निवेदने देत आहेत. मंदिराची अवस्था पाहून मुरलीधर महाराजांनी जीर्णोव्दाराचे काम त्वरित करण्यासाठी उपोषण सुरू केले होते. तत्कालीन खासदार अशोक नेते यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा केल्यानंतर गेल्यावर्षी नव्या जोमाने हे काम सुरू करण्यात आले. पण कामाला अजूनही जास्त गती नाही.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणीस, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही मार्कंन्डादेव मंदिराला भेट देऊन भक्तजणांचा आक्रोश पाहून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम त्वरित करण्याचे निर्देश दिले. परंतु कामाची स्थिती समाधानकारक नाही.