गडचिरोली : खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी शासकीय विश्राम भवनात रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या रेल्वेमार्गाचे काम करताना कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा त्याच्या शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही या संदर्भात खबरदारी घेण्याचीही सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने नागभीड परिक्षेत्रात रेल्वे विभागाच्या उपलब्ध जागेवर रेल्वेचे नवीन काही प्रकल्प सुरु करता येईल का? या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना डॉ.किरसान यांनी दिल्या.या बैठकीला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रेल्वेचे उपमुख्य अभियंता अरविंद विश्वकर्मा, कार्यकारी अभियंता गोपीधन गिधोरा, रेल्वे अभियंता आर.पी.सिंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.