मराठीच्या गोडव्याची सर इतर भाषांना नाही’ – प्रा श्रीकांत नाकाडे

0
30

शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय मराठी भाषा गौरव दिन साजरा
अर्जुनी मोरगाव-” मराठी भाषेचा गोडवा सर्वत्र प्रसिद्ध आहे. या भाषेच्या बोलींनी मराठीला अधिक समृद्ध केले आहे. बोलींना जो गोडवा आहे तोच भाषेला आहे. आता मराठी ही भाषा अभिजात भाषा म्हणून घोषित झालेली आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाषा ही आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे ती टिकविणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. याकरिता सर्वांनी मराठीचा आग्रह धरून आपल्या भाषेला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा ” असे मत स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय येथील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत नाकाडे यांनी व्यक्त केले. ते मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ईश्वर माहुर्ले आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रस्ताविकातून डॉ. शरद मेश्राम यांनी ” आपण आपल्या मातृभाषेची मध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी विषयी मिळेल ते ज्ञान ग्रहण करण्याची आपली मानसिकता आपण तयार करायला पाहिजे. रोज अवांतर वाचन आणि काहीतरी लेखन आपण केले पाहिजे, यामुळे आपल्या ज्ञानात वाढ होऊन या कौशल्यांनी आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होण्याला मदत होईल” असे मत मांडले.
अध्यक्ष भाषणातून डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी ” मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. तिचे बोलण्यातले आणि लिहिण्यातले सौंदर्य वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. बोलताना आपले उच्चार स्पष्ट असले पाहिजे, लकब असली पाहिजे यानेच भाषेचे सौंदर्य टिकून राहते ” असे मत मांडले
या कार्यक्रमाचे संचालन कु. पायल शेंडे आणि आभार प्रदर्शन कु.छुन्नी भेंडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वैशाली सयाम, हर्षा कुलसुंगे, रश्मी खोब्रागडे, निकिता ठाकरे, अंजली तवाडे, कृपाली गुरनुले, साक्षी कांबळे, अमिषा चौधरी आणि संजित राखडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.