धोबल नाल्यात अवैध रेती उपसा; तक्रारदारांना धमक्या, प्रशासनाचा संशयास्पद मौन

0
27

अर्जुनी मोरगाव: तालुक्यातील किशोरी-गेवर्धा मार्गावर केशोरीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या धोबल नाल्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे फावले असून, रात्री बारा वाजल्यानंतर हा परिसर अक्षरशः रेतीच्या ट्रॅक्टर व डंपरच्या धडाक्याने हादरतो. स्थानिक नागरिकांनी अनेकदा यासंबंधी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट, तक्रार करणाऱ्यांची माहिती अधिकाऱ्यांकडून थेट रेती माफियांना पोहोचवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अवैध रेती उपशामुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरण धोक्यात आले आहे. धोबल नाला हा वन विभागाच्या अख्त्यारीत येतो, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जेव्हा काही नागरिकांनी वन विभाग व महसूल प्रशासनाकडे तक्रार केली, तेव्हा तक्रार करणाऱ्यांची माहिती थेट रेती तस्करांपर्यंत पोहोचवली गेली. परिणामी, तक्रारदारांना धमक्या मिळत असून, अनेकजण भीतीपोटी आवाज उठवायला तयार नाहीत.

दरमहा लाखोंचा गैरव्यवहार?

स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, रेती तस्करीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना एका ट्रॅक्टर मागे दरमहा तब्बल १५,००० रुपये दिले जातात. जर एकाच रात्रीला १५-२० ट्रॅक्टर रेती चोरी होत असेल, तर हा गैरव्यवहार लाखोंच्या घरात जातो. हा अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही अधिकारीच माफियांच्या मदतीला धावून जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

प्रशासन गप्प का?

धोबल नाला हा वन विभागाच्या अख्त्यारीत असूनही, जिल्हा वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही. महसूल व पोलीस प्रशासनही यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने, संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.

सरकार व प्रशासनाला प्रश्न

वन विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या नाल्यात खुलेआम अवैध रेती उपसा कसा सुरू आहे?

तक्रारदारांची माहिती गुप्त ठेवण्याऐवजी रेती माफियांना देण्यामागे कोण?

महसूल व पोलीस प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का?

एका ट्रॅक्टर मागे १५,००० रुपये घेतले जात असल्याच्या आरोपांची चौकशी होणार का?