आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत 1356 आजारांवर उपचार सुविधेचा लाभ घ्यावा-आमदार बडोले

0
53

अर्जुनी मोरगाव-तालुक्यातील प्रतापगड येथे २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असून, ‘ख्वाजा गणी हारुनी उर्स’चेही आयोजन करण्यात येते.या ठिकाणी डोंगर फोडून प्रतापगड किल्ला बांधण्यात आला. हिंदु व मुस्लीम यांचे एकतेचे प्रतिकही ह्या ठिकाणी बघावयास भेटते.प्रतापगड यात्रेला संपूर्ण विदर्भातूनच नव्हे,तर छत्तीसगड,मध्यप्रदेश येथूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.या ठिकाणी उंच पहाडावर भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात.जमीन पातळीपासून ते महादेव मंदिरापर्यंत तब्बल सात किमीचे अंतर आहे. मात्र, लहानापासून ते वृद्धांपर्यंत भाविक न थांबता महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सतत पहाडावर चालत असतात. या ठिकाणी गेल्या ३०० वर्षांपासून यात्रा भरत असल्याचे गावकरी सांगतात. उंच पहाडावर गोंड राजाने बनविलेला प्रतापगड किल्ला आजही दिमाखात उभा असून, त्या ठिकाणी भगवान शिवजींची मूर्ती तसेच शिवलिंग आजही आहे. जंगलांनी वेढलेल्या या किल्ल्यात प्राचीन विहिरी, गुफा आजही पाहावयास मिळत असून, दूरवरून येणारे भाविक पाच दिवस चालणाऱ्या यात्रेला आवर्जून भेट देतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी लाखो हिंदू-मुस्लीम बांधव एकच गर्दी करुन दर्शन घेत असतात.त्या लाखो भाविकांना सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नाने पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
यात्रे दरम्यान ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या एकत्रित सहकार्याने दि.26 रोजी महाशिवरात्रीच्या पर्वावर प्रतापगड येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.महा आरोग्य शिबीराचे उदघाटन मोरगाव अर्जुनी क्षेत्राचे आमदार ईजि.राजकुमारजी बडोले व गोंदिया जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.कार्यक्रम प्रसंगी ग्राम प्रतापगडचे सरपंच भोजरामजी लोगडे, मोरगाव अर्जुनी पंचायत समितीचे माजी उपसभापती होमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, अध्यक्ष मच्छीमार संघट्ना ढोके सर, ग्राम केशोरीचे सरपंच नंदकुमार गहाणे,सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार ईजि.राजकुमारजी बडोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब ग्रामीण लोकांच्या परिवारासाठी आरोग्याचा उपचार व्हावा यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. शासनाने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती  वाढवल्याने गोरगरिबांना आरोग्यविषयक उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.1356 आजारांवर आता मोफत उपचार मिळणार आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान आयुष्मान योजनेचे एकत्रीकरण करुन या योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा नागरिकांना मिळणार असल्याने लोकांनी आपले आजाराचे कवच गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
भविष्यात आजार होवुन उपचारासाठी बिकट आपत्ती उदभवु नये यासाठी आजच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घ्यावा.हे कार्ड सीएससी केंद्र,आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र,या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय व सद्य स्थितीत आरोग्य विभागामार्फत ई-के.वाय.सी.द्वारे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी याप्रसंगी दिली.
मोफत आरोग्य तपासणी दरम्यान जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर वर्ग,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,बालरोग तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,मानसोपचार तज्ञ व त्यांची सर्व टीम उपस्थित होती.या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्करोग,हृदयरोग,मधुमेह, मोतियाबिंदू,किडनीचे व पोटाचे आजार,मेंदूचे आजार व इतर दुर्धर आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार व प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या असून त्याचा लाभ बहुसंख्य भाविकांनी यावेळी घेतला.यावेळी आरोग्य विभाग,के.टी.एस.सामान्य रुग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांचे मार्फत 30 जनजागृती स्टॉलच्या माध्यमातुन आरोग्य कार्यक्रम व योजनांची जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,मोरगाव अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल यांचेसह जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर्स,स्टाफ नर्स,आरोग्य कर्मचारी,जिल्हा समन्वयक,आशा सेविका व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,सुत्रसंचालन जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी मानले.