नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घेण्याकरिता प्रदर्शनाला भेट द्यावी- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

0
13

जनजागृती व्हॅनचे हिरवी झेंडे दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभारंभ

गडचिरोली,दि.03:: भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी
जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली येथे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या
प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
अविश्यांत पंडा यांनी आज येथे केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, जिल्हा प्रशासन गडचिरोली, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय
गडचिरोली, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली, जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्यातर्फे
उद्या (दि.४ मार्च) मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे नवीन कायद्याविषयी जनजागृती
करण्यासाठी नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावर दोन दिवसीय मल्टीमीडिया
छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आज जनजागृती
वाहनाचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारचे केंद्रीय
संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी
उपस्थित होते.