सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर
भंडारा : मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेले रेती, मॅगनीज व गौण खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी असे पत्र या क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसिलदार यांना पाठवले आहे.
या पत्रात ” घाट चालवतांनी कोतवालापासुन ते जिल्हाधिकारी, महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई पासून ते पोलीस अधिक्षक, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येते. त्यामुळे कुणीच आमचा बाल-वाका करु शकत नाही….” असा घणाघाती आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने त्यांच्याच युतीतील पक्ष श्रेष्ठीवर केल्याने खळबळ उडाली आहे.जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू कारेमोरे यांचे पत्र वाचून दाखवत हे आरोप गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले. आमदार कारेमोरे यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मोहाडी तालुक्यातील बेटाळा, निलज, कान्हळगाव, मुंढरी, मोहगाव देवी, पांजरा, रोहा या काही घाटावर रेती डेपो आहेत व काही घाटावर डेपो नाहीत. ज्या कोणी ठेकेदारांनी सदर डेपो किंवा घाट घेतलेले आहेत, ते फक्त नाममात्र आहेत. सदर संपूर्ण घाट व डेपो वैद्य पध्दतीने किंवा नियमानुसार न चालवता अवैद्य पध्दतीने व नियम धाब्यावर बसवून चालवत आहेत.