आपत्ती निवारणासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
39
  • आपत्ती व्यवस्थापन बाबत कार्यशाळेचे आयोजन

      गोंदिया, दि.6 : कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पूर्व नियोजन करुन जिवित व वित्तीय हानी कमी केली जावू शकते. त्यामुळे कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात नैसर्गीक आपत्तीबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) Bn-5 पुणे चे उपसमादेशक अशोक कुमार, पोलीस निरीक्षक (NDRF) कृपाल मुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, आपत्ती काळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व बचाव याबाबतची संपूर्ण माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. आपत्तीमध्ये जिवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम प्रतिसादकर्ताची भूमिका घेणे महत्वाचे आहे. अशावेळी जोपर्यंत आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत पोहोचत नाही तोपर्यंत घटनास्थळी गरजूंना तात्काळ स्थानिक लोकांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

        राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे उपसमादेशक अशोक कुमार यांनी पूरपरिस्थितीपासून सुरक्षा व बचाव यावर करण्यात येणारी उपाययोजना, भूकंप दरम्यान घ्यावयाची दक्षता व उपाय, आगीच्या घटनेदरम्यान करण्यात येणारी कृती, जखमींना प्रथमोपचार, हृदय व फुफ्फुसीय पुनरुत्थान (CPR- Cardio pulmonary resuscitation) तसेच घरगुती वस्तुंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटींग डिवाईस यासंदर्भात उपस्थितांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

       सदर कार्यशाळेत पोलीस निरीक्षक (NDRF) कृपाल मुळे यांनी पूर, वीज, आग, भूकंप, रस्ते अपघात व उष्णतेच्या लाटा यासारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

     या कार्यशाळेत पूर व्यवस्थापन : सुरक्षित स्थलांतर, बचावकार्य, पूरपरिस्थिती काळात घ्यावयाची काळजी. वीज अपघात टाळण्यासाठी उपाय : सुरक्षित वीज वापर, वीज पडल्यास घ्यावयाची काळजी. अग्निशमन व्यवस्थापन : आगीपासून बचाव, अग्निशमन यंत्रांचा योग्य वापर. भूकंप संरक्षण : भूकंपाच्या वेळी आणि नंतर घ्यावयाची काळजी. रस्ते अपघात व्यवस्थापन : अपघात झाल्यास प्राथमिक उपचार, मदतकार्य. उष्णतेच्या लाटा : उष्माघातापासून बचावाचे उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

        या कार्यशाळेद्वारे नागरिकांना आपत्ती काळात स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवावा, तसेच प्रशासनाला मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कशी भूमिका बजवावी याची सविस्तर माहिती देण्यात आली. आपत्तीच्या वेळी सजगता आणि तत्परता राखून सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

         कार्यक्रमास अग्नीशमन अधिकारी निरज काळे, डॉ.निरंजन अग्रवाल, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक संजय धार्मिक, उपअधीक्षक डी.एच.पोरचेट्टीवार, नाझर राकेश डोंगरे, जिल्हा संघटक (गाईड) चेतना ब्राम्हणकर यांचेसह एमबीबीएसचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, एनएसएसचे स्वयंसेवक व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

        या कार्यक्रमानंतर गोरेगाव तालुक्यातील कटंगी जलाशय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आपत्ती परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रत्यक्षात काय केले पाहिजे याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. सदर प्रात्यक्षिकाप्रसंगी नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.