चंद्रपूर मनपाचे ६८७.१८ कोटीचे अंदाजपत्रक सादर

0
23

चंद्रपूर, ता. ६ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी सन २०२४-२५ चे सुधारित आणि २०२५-२६ चे वार्षिक अर्थसंकल्प प्रशासक समितीच्या मान्यतेसाठी सादर केले आहे. गतवर्षी ६१४.५८ कोटीचे शिलकी अंदाजपत्रक होते. तर, यावर्षीचे अंदाजपत्रक हे ६८७.१८ कोटीचे आहे.

    २०२५-२६ यावर्षीचे अंदाजपत्रक हे तुटीचे आहे. यामुळे या वर्षात महसुली उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच महसुल वाढीसाठी उत्पन्नात वाढ आणि उद्दिष्टानुसार कराची वसुली करावी लागणार आहे. चालू वर्ष २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पात मनपाच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतापासून ५०.२४ कोट रुपये अपेक्षित आहे. मात्र, नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत केवळ २४.१० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुढील चार महिन्यांत २६.१४ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. मालमत्ता करापासून थकबाकीसह ३६.७१ कोटी रुपये अपेक्षित होते. तर, यावर्षी हे उत्पन्न ३५ कोटी एवढे ठेवण्यात आले आहे.

  मूलभूत सेवेसाठी कंत्राटी तत्वावर मजूर कर्मचारी घेण्यात आली आहेत. या कंत्राटी मजुरांना किमान वेतनासह महागाई भत्ता व इतर देयके देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये या कर्मचाऱ्यांवर ३८ कोटी ५७ लाख २२ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र, यावर्षी खर्चात कपात करून ३३ कोटी ९० लाख एवढा निर्धारित करण्यात आला आहे. कंत्राटी मजुरी दरात झालेल्या वाढीचा खर्च मनपाला स्व उत्पन्नातून करावा लागत आहे. यामुळे महसुली खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम विकासकामावरील निधीवर होत आहे.

    गतवर्षी माझी वसुंधरा अभियान, श्री गणेशोत्सव, दिव्यांग कल्याण योजना, महिला व बालकल्याण धोरण, स्पार्क अवार्ड, आयुष्यमान भारत आदी उपक्रम राबविण्यात आले होते. शहरातील सात नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राच्या माध्यमातून २० आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. अमृत अभियान-२ मध्ये मनपाला ३० टक्के म्हणजेच ८५.७९१ कोटी वाटा टाकावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या अंदाजपत्रकात ७० कोटीचा समावेश केला आहे. मलनिस्सारण प्रकल्प पहिला टप्पा यात १६२.६१ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार असल्याने २० कोटीचा समावेश आहे. रामाळा तलाव पुनरुज्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी लागणारे ९ कोटी खनिज विकास निधीतून प्राप्त होणार आहे.

    वीज बिलावर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेद्वारा २५० किलोवॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले असुन पुढील आर्थिक वर्षात यात १ हजार किलोवॅटची वाढ करण्याचे नियोजन आहे.सौर ऊर्जेच्या माध्यमातुन वीजबिलात बचत करण्यासाठी ऊर्जा खरेदी करार (पावर पर्चेस अग्रीमेंट) ची अंमलबजावणी PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) द्वारे करण्यात येऊन वीजबिलावर होणाऱ्या सुमारे १२ कोटी रुपये खर्चाच्या ६० टक्के बचतीचे उद्दीष्ट आहे.

नागरीकांना मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन देणार – महानगरपालिकेद्वारा एकुण ५८ सेवा या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरीकांना घर बसल्या दिल्या जात आहेत. यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास प्रत्येक घरी क्युआर कोड यंत्रणा लावण्यात येणार आहे.

उत्पन्नाचे घटक –

   मालमत्ता कर व इतर करातून ५१.९८ कोटी, सफाई शुल्क ६.२५ कोटी, उपयोगिता शूल्क १२ कोटी, वाढीव चटई क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी प्रदान करणे यातून १४ कोटी, खासगी बांधकामे, फ्लॅट नियमानुकूल करणे ५ कोटी, जीएसटी सहायक अनुदानातून १५ व्या वित्त आयोग २०२४-२५ मध्ये १४ कौटीपैकी ७ कोटी प्राप्त होणे बाकी आहे. त्यामुळे यावर्षीचे १५ कोटी आणि थकीत ७ असे २२ कोटी मिळणे अपेक्षित आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या बक्षीस रकमेतून ५ कोटी, स्वच्छ सर्वेक्षण बक्षीस ७.५० कोटी मिळणे अपेक्षित आहे. तसेच मनपाच्या इमारती, गोळे भाड्यातून २.७० कोटी, पाणीपुरवठा कर ७ कोटी, पाणीपुरवठा मिटरिंग व टेलिस्कोपिंग शुल्कातून ५ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे.

यावर होणार खर्च –

   आस्थापना खर्च वेतन, भत्ते यावर ३४.०८ कोटी, निवृत्तीवेतन व त्यावरील लाभापोटी २५ कोटी, अग्निशमन, यांत्रिकी, स्वच्छता, पाणीपुरवठा, उद्यान विभाग व इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ३३.९० कोटी, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, भूमिगत गटार योजना, पायाभूत, अमृत २, घनकचरा व्यवस्थापन, बॉयोगॅस प्रकल्प, बांधकाम, पाडकाम प्रक्रिया प्रकल्प, शिक्षण विभाग वेतन, निवृत्ती वेतन यावर मनपाचा हिस्सा ६४.५ कोटी, महिला व छोटी मुले विश्रामगृह, बालोद्यान, महिलांकरिता सुविधा व योजना राबविण्यासाठी १.८ कोटी, तृतीयपंथी व्यक्तीच्या विकासासाठी प्रशिक्षण २५ लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकाकरिता सुविधा पुरविणे ३० लाख, नागरी दलित वस्ती २० कोटी, दिव्यांग धोरण १.३० कोटी, शहर सौंदर्यीकर ७५ लाख, रस्ता बांधकाम ३.५० कोटी, मनपा झोनकरिता ६० लाख आणि नाली, चेंबर, रस्ता, संडास, मुत्रीघर, मनपा इमारत, सार्वजनिक विहिरी गाळ उपसा, सुरक्षा जाळी, आकस्मिक खर्च यासाठी १.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.