जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा- प्रजित नायर

0
64

गोंदिया 11:- जलयुक्‍त शिवार अभियान 2.0 शासनाच्या वतीने सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत असलेली कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, देवरीचे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सत्यजित राऊत, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानवडे, शिक्षणाधिकारी महामुनी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जलशक्ती अभियान या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रलिंबत असलेली सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले.

जलशक्ती अभियान कॅच द रेन या अभियानाअंतर्गत विविध विभागांकडून 2843 कामाचे नियोजन झाले असून त्यापैकी 2658 कामे पूर्ण झाली आहेत. जलसिंचन कामाची सातवी प्रगणना व जलसाठयाची दुसरी प्रगणना लवकरच करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हयातील तालुका प्रगणना अधिकारी यांची नेमणूक झाली असून तालुका निहाय प्रगणना निश्चित करणे सुरु आहे. या कामासाठी जास्तीत प्रगणना नेमण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.