चेक बाऊन्स टाळा, 885 रुपयांचा भुर्दंड वाचवा!

0
54

 नागपूरदि. 11 मार्च 2025: महावितरण ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देते. मात्र, ऑफलाइन पद्धतीने, म्हणजे चेकने बिल भरणाऱ्या ग्राहकांपैकी हजारो ग्राहकांचे चेक दरमहिन्याला विविध कारणांमुळे बाऊन्स होतात, यामुळे ग्राहकांना 885 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसतो आणि मानसिक त्रास होतो.

चेक बाऊन्स झाल्यास होणारे नुकसान:

वीज बिल भरणा करण्यासाठी दिलेल्या प्रत्येक चेक बाऊन्ससाठी 750 रुपये आणि त्यावर 18 टक्के जीएसटी किंवा बँक शुल्क, यापैकी जी रक्कम जास्त असेल, तो दंड आकारला जातो. त्यामुळे ग्राहकांना 885 रुपयांपर्यंत भुर्दंड बसतो. शिवाय चेक बाऊन्स मुळे बिल भरण्यास विलंब झाल्यास, पुढील बिलात विलंब आकार लावल्या जातो. चेक बाऊन्स झाल्यास, 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ग्राहकाची चेकद्वारे बिल भरण्याची सुविधा काही काळासाठी निलंबित केली जाते. चेक बाऊन्स मुळे सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. सोबतच आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होऊ शकते.

चेक बाऊन्स होण्याची कारणे:

चेकवर चुकीची तारीख लिहिणे, खाडाखोड करणे, चुकीची स्वाक्षरी करणे, चुकीचे नाव लिहिणे आणि खात्यात पुरेशी रक्कम नसणे याकारणांमुळे चेक बाऊन्स होतात.

चेक बाऊन्स टाळण्यासाठी उपाय:

चेक बाऊन्सचा त्रास टाळण्यासाठी, ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरण्याचा पर्याय निवडावा, चेक देण्यापूर्वी खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करावी, वीज बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या किमान तीन दिवस आधी चेक जमा करावा तसेच चेक भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

ऑनलाइन बिल भरण्याचे फायदे:

ऑनलाइन विज बिल भरल्यास, 0.25टक्के (500 रुपयांपर्यंत) सवलत मिळते. याशिवाय घरबसल्या कधीही बिल भरता येते. ऑनलाइन बिल भरणा सुरक्षित असून महावितरणच्या वेबसाइट, मोबाईल ॲप, व इतर पेमेंट ॲप्स द्वारे वीज बिलाचा भरणा करता येतो.

ऑनलाइन बिल भरण्यासाठी पर्याय:

महावितरणची वेबसाइट (www.mahadiscom.in), महावितरणचे मोबाईल ॲप, महा पॉवर पे, पेमेंट वॉलेट (फ़ोन पे, गुगल पे, मेटीएम, क्रेड,), डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करणे शक्य असून यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल 10 हजारापेक्षा अधिक असलेली वीज बिलाची रक्कम आरटीजीएस किंवा एनईएफटीव्दारे देखील भरता येत असल्याने आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास आणि वेळ वाचविण्यासाठी ग्राहकांनी चेकऐवजी ऑनलाइन पद्धतीने बिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.