खेमेंद्र कटरे/ गोंदिया,दि.१३- राज्य पशुधन वैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालय परिसरात मुदतबाह्य औषधासंह उपयोगी असलेल्या औषधांचा साठा रुग्णालयाच्या बाहेर आणि वर्हाड्यांत कचरा समजून फेकल्याचे चित्र १२ मार्च रोजी जिल्ह्यातील शेंडा,चिखली आदी पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरात बघावयास मिळाले.यावरुन शासकीय कर्मचार्यांकडून शासकीय मालमत्तेचा एकप्रकारे नासधूस करण्याचा प्रकार असून पशुवैद्यकीय रुग्णालयात सतत गैरहजर राहून प्रभार असलेल्या ठिकाणी असल्याचे सांगत दिशाभूल करणार्यांवर प्रशासनाने गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याची गरज आहे.
शेतकर्यांच्या पाळीव जनावरांच्या संवर्धन व संगोपनासाठी राज्य पशुसवंर्धन व जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून विविध सेवा दिली जाते.यामध्ये जनावराचे लसीकरण,विविध साथींच्या आजारावर उपचार करण्यासाठी औषधे,सलाईनचा मोफत पुरवठा केला जातो.मात्र पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक हे नियमित हजर राहत नसल्याने लाखो रुपये किमतीचे औषधे,सलाईन,पावडर,टॅबलेटस मुदतबाह्य होऊन पडल्या असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिसून आले.गेल्या दोन दिवसापासून सातत्याने जिल्ह्यातील श्रेणी १ पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यकीय दवाखान्याना भेट दिली असता एका पशुवैद्यकीय अधिकार्याकडे १ ते ३ पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रभार असल्याचे जाणवले.या गोष्टीचाच लाभ घेत पशुवैद्यकीय अधिकारी हे यापैकी एकाही ठिकाणी हजर राहत नसल्याचे दिसून आले.तर विचारणा केल्यावर आपण दुसर्या पशुवैद्यकीय दवाखान्यात असल्याचे सांगतात,मात्र तिथे पोचल्यावर तेथील कर्मचारी मात्र साहेब आलेच नसल्याचे सांगत असल्याने पशुवैदयकीय अधिकारी शासनासोबतच जनतेची सुध्दा फसवणूक करीत असल्याचे दिसून आले.

पशुवैद्यकीय दवाखान्याचा वेळ सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंतचे असून १२ मार्च रोजी देवरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना, त्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा,सडक अर्जुनी व चिखली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेट दिल्यावर यावेळेत एकही पशुवैद्यकीय अधिकारी हजर नव्हते.तर सालेकसा तालुक्यातील सालेकसा,पिपरीया येथील पशुदवाखान्याची हीच परिस्थिती असून आत्ताच आपण तिथून आलो असे सांगून पशुवैद्यकीय अधिकारी हे सर्वसामान्य पशुपालकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले.सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा पशुवैद्यकीय दवाखान्याचे रंगरंगोटीचे काम सुरु असून या दवाखान्यातील उपयोगी असलेली औषधी ही व्यवस्थित न ठेवता कचर्यासारखी फेकून ठेवली आहे.तर चिखली येथील पशुवैद्यकीय दवाखानाच्या मागच्या भागात २०२५ जानेवारी व फेब्रुवारीमध्ये मुदत संपलेल्या सलाईन फेकण्यात आल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील पशुपालकांना गेल्या अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखाना आहे राम भरोसे झाले आहे.त्यामुळे येथील पशु जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय व इतर शासकीय योजना पासून लाभार्थी वंचित झाले आहेत. विशेष म्हणजे सन 2022 मध्ये शासनाकडून मराठवाडा पॅकेज करिता अर्ज मागविण्यात आले होते.त्यामध्ये मराठवाडा योजनेत लाभार्थ्यांची निवड झाली आहे.परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही फाईल धुळखात आहे.सालेकसा येेथील पशुवैद्यकीय अधिकारी गोंंदिया व आमगाव वरून अपडाऊन करतात.तर शेंडा व सडक अर्जुनी येथील पशुधन पर्यवेक्षक श्री.पदम हे दोन्ही ठिकाणी आज गैरहजर होते.तर सडक अर्जुनीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.शितल वानखेडे या आज दवाखान्यात पोचल्याच नाही.तर चिखलीच पशुवैद्यकीय दवाखान्याचे डाॅ.सौरभ कवठे यांनी ३ वाजेपुर्वीच दवाखाने बंद करुन निघून आले.सडक अर्जुनी तालुका पशुधन विकास अधिकारी(विकास) श्री वाघाये यांना विचारणा केल्यावर त्यांनी आपण गोंदियात मिटिंगमध्येे असल्याचे सांगितले.
पशुधन पर्यवेक्षक व पशुवैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी सुद्धा मुख्यालय राहत नसून ते बाहेर गावावरून येजा करीत असल्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने हे सुखसुकाट व मोकाट पडले आहे.सालेकसा,देवरी व सडक अर्जुुनी हे तालुका नक्षलग्रस्त क्षेत्र परंतु आजही पशुवैद्यकीय अधिकारी हे दवाखान्यात नियमित येत नसल्याने व या भागातील लोकप्रतिनिधींचा त्यांचावर वचक नसल्यानेच ते कधीही येऊन जात असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
प्रतिक्रिया
गोंदिया जिल्हायात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 – ४१ व श्रेणी 2 – 30,१ मोबाईल असे एकुण 71 दवाखाने कार्यरत आहेत.श्रेणी १ पशुवैद्यकीय दवाखान्यात ४२ पाहिजे परंतु सध्या २५ डाॅक्टर कार्यरत आहेत.तर श्रेणी २ मध्ये डाॅक्टर आहेत.जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकारी संख्या कमी असल्यामुळे एकाकडे दोन ते तीन दवाखान्यांचा प्रभार सोपवण्यात आलेला आहे,त्यामुळे एका ठिकाणी मिळणे कठीण आहे.मात्र औषध साठा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी पाळणे योग्य असून त्यासंदर्भात चौकशी करण्यात येईल.
डाॅ.कांतीलाल पटले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया