गोरेगाव तालुक्यातील 22 अंगणवाडीतील 100 टक्के बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार

0
21

गोरेगाव,दि.१२--तालुक्यातील 1 मार्चपासुन जिल्ह्यात आरबीएसके 2.0 विशेष तपासणी मोहीम सुरु झाली असुन दुसर्या पंधरवाड्यात तपासणी होणार्या गोरेगाव तालुक्यातील 22 अंगणवाडीतील 100 टक्के बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होण्याच्या दृष्टीने संबधित बाल विकास अधिकारी यांनी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी शिक्षण विभाग,आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाला दिले आहे. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दुसर्या पंधरवाड्यातील दि. 10 ते 22 मार्च दरम्यान गोरेगाव तालुक्यातील 22 अंगणवाडीतील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी दिली आहे.
असे एकुण गोरेगाव तालुक्यातील 22 अंगणवाडीतील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय समन्वयक संजय बिसेन यांनी दिली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत असलेले व्यंग,लहान मुलांमधील आजार,जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार असुन या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक मुलाची संपूर्ण आरोग्य तपासणी आरबीएसके पथकांकडून शाळा व अंगणवाडींना भेटी देवून तेथील बालकांची डोक्यापासुन पायाच्या अंगठा म्हणजेच Head to Toe तपासणी करण्यात येणार आहे.प्रत्येक मुलाची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाईल, ज्यामध्ये नियमित वैद्यकीय तपासणी,तापमान आणि रक्तदाब तपासणी आणि आवश्यक असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला जाईल.सरकारी आरोग्य कार्यक्रमांतर्गत, जन्मजात दोष असलेल्या बालकांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रिया महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजना, आयुष्‍मान भारत योजना अंतर्गत अंगीकृत रुग्‍णालयांत करण्‍यात येणार आहे.आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या/ अडचणीसाठी योग्य ते संदर्भ सेवा तसेच या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.