इतरांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करतांना कृउबा संचालक ठाकरे स्वतःच्या भ्रष्टाचारात अडकले

0
1279

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश: कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनलाल ठाकरे निलंबित

गोंदिया,दि.१४- गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणामुळे माजी उपसभापती व सध्या संचालकपद भूषवणारे धनलाल ठाकरे यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रशांत सोनारकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.विशेष म्हणजे श्री.ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीकडे लक्ष दिल्यास अतिउत्साहीपणाने ते नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असल्याचे बघावयास मिळाले.ग्रामपंचायतीचे बांधकाम असो,जिल्हा परिषदेचे काम असो की इतर मात्र यावेळी स्वतःच बाजार समितीचे संचालक असताना विद्यमान सभापतींचा भ्रष्टाचार काढतांना आपल्याच उपसभापती पदाच्या गैरप्रकारात आढळल्याने आजच्या परिस्थितीला त्यांची राजकीय परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाली आहे.े

३४ बनावट नियुक्त्या, कोट्यवधींचा आर्थिक फटका
चौकशीत उघड झाले की, श्री. ठाकरे यांनी कार्यकाळात नियम धाब्यावर बसवून ३४ तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची बोगस नियुक्ती केली. एवढेच नव्हे, तर आधी त्यांना पाचवी आणि नंतर सहावी वेतनश्रेणी लागू केली, ज्यामुळे समितीला एकूण ३ कोटी ८२ लाख ६४ हजार १३५ रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

पदाचा गैरवापर व शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप
जिल्हा उपनिबंधकांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, श्री. ठाकरे यांनी आपल्या पदाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आणि शासनाची दिशाभूल करून अनियमित नियुक्त्या केल्या. ही संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या पूर्णतः विरोधात होती आणि यामुळे समितीच्या आर्थिक स्थैर्यावर गंभीर परिणाम झाला.

भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई, जप्ती व वसुलीची तयारी
प्रशासन या घोटाळ्यात जप्ती व वसुलीच्या कारवाईची तयारी करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसू शकेल.

जनतेने परिवर्तन घडवले, घोटाळे उजेडात आले
हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की दोन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, जनतेने माजी संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मोठे परिवर्तन घडवले. नव्या संचालक मंडळाने सातत्याने जुन्या घोटाळ्यांची चौकशी सुरू केली असून त्यातून हा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही फक्त सुरुवात आहे आणि भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता पाहण्यासारखे असेल की, संबंधित दोषींवर प्रशासन कोणत्या स्वरूपाची कठोर कारवाई करते आणि जनतेला न्याय मिळण्यास किती वेळ लागतो.