गोंदिया जिल्हा परिषदेच्या जागेवर सार्व.बांधकाम विभागाने केला कब्जा

0
702
कार्यालय बांधकामाकरीता तोडली ५० वर्ष जुनी झाडे
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप; झाडांचीही कत्तल
खेमेंद्र कटरे
गोंदिया ः
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून अनेकदा जिल्हा परिषदेची मालमत्ता कुठे आहे,हे शोधण्याकरीता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येते.तर काही वेळा मालमत्ता अधिकारी यांची मानधनावर नेमणूक करुन मालमत्तेचा शोधही घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.तरीही जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी आपल्या मालकीच्या मालमत्तेचे सरंक्षण करण्याकडे केलेल्या दुर्लक्षामूळेच आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम (राज्य)विभागाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत बांधकाम सुरु करण्याकरीता त्या परिसरातील शेकडो वर्ष जुन्या झाडांची कटाई केल्याचे प्रकरण समोर आले आहे.आमगाव तालुक्याच्या रिसामा येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम (राज्य) विभागाने अतिक्रमण करीत ती जागा हडपली आहे. इतकेच नव्हे,तर अतिक्रमणात अडसर ठरत असलेल्या झाडांचीही कत्तल केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या प्रतापामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

रिसामा येथील गट क्रमांक ७७७, मालमत्ता पत्रक क्रमांक ४१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीचे शासकीय विश्रामगृह, गोदाम, बगीचा व अन्य इमारती अस्तित्वात आहेत. १९६० पासून सदर विश्रामगृह व परिसर जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत आमगाव विभागाकडे देखभाल, सुरक्षेकरिता शासनाने दिला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम (राज्य) विभागाने मुजोरी
करत या जागेवर अतिक्रमण केले आहे. ही जागा हडपून त्या जागेवर अनधिकृतरित्या बांधकाम सुरू केले. ८ व ९ मार्च रोजी शासकीय सुटीच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव येथील शाखा अभियंता नरेश सोनवाने यांनी कंत्राटदारामार्फत ५० वर्षांपूर्वीचे दोन मोठे आंब्याचे झाड (बहरलेले) व अन्य तीन झाडांची कत्तल केली. ही झाडे परस्पररित्या विकली. इतकेच नव्हे, तर १० मार्च रोजी त्याच जागेवर दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती व मुरमाचे अवैधरित्या बांधकामसुद्धा सुरू केले. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेले पक्क्या इमारतीचे बांधकाम थांबविण्यात यावे, याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यानी १० मार्च रोजी आमगाव
येथील तहसीलदारांकडे केली. मात्र, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाची मुजोरी कायमच होती.
२२ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे  शाखा अभियंता व संबंधित कंत्राटदाराने जेसीबीने खोदकामास सुरवात केली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे एस. टी. बाजपेयी यांनी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र घेऊन कामास सुरवात करावी, असे सांगितले. तरीही शाखा अभियंता सोनवाने व संबंधित कंत्राटदाराने बळजबरीने कामास सुरवात केली. अशी तक्रार आमगाव पोलिस ठाण्यात केली आहे. याच प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश
हर्षे यांच्यासह काही जिल्हा परिषद सदस्यांनीही केली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण केलेल्या जागेवरील बांधकाम थांबवितो की आपली मुजोरी कायम ठेवतो,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.                                जि.प उपाध्यक्ष व सदस्यांनीही केली पोलिसात तक्रार
सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदियाच्या आमगाव उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांनी जबरदस्तीने जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करुन झाडांची कत्तल करुन सुरु केलेले बांधकाम त्वरीत थांबविण्यात यावे यासंदर्भातील तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जि.प.सदस्य किशोर महारवाडे,हनवंत वट्टी,भाजपचे पदाधिकारी नरेंद्र बाजपेयी यांनी आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राणे यांना दिली आहे.
जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंत्याने प्रशासनाकडे केला पत्रव्यवहार
 आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने सुरू केलेले कार्यालयाचे बांधकाम जि.प.विश्रामगृहाच्या जागेत अतिक्रमण करुन सुरु केले असून यांसदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभागासह आमगाव तहसिलदार,आमगाव पोलीस स्टेशन याठिकाणी लेखी  जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आमगावचे उपविभागीय अभियंता प्रविण दमाये यांनी पत्रव्यवहार केला आहे.