-पदव्यूत्तर इतिहास विभागात जय शिवराय स्टडी सर्कलचे उद्घाटन
नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना आपल्याकडे उपलब्ध असेल त्या शस्त्राचा वापर करण्याचे मावळ्यांना आवाहन केले होते. त्याचप्रमाणे आपण जीवनात छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या शिकवणीतील माणुसकीच्या शस्त्राचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागात ‘जय शिवराय स्टडी सर्कल’चे उद्घाटन शुक्रवार, दि. २८ मार्च २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू मार्गदर्शन करीत होत्या.
महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मानव्य शास्त्र इमारतीतील पदव्युत्तर इतिहास विभागात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी तर व्याख्याते म्हणून विभागातीलच विद्यार्थी वेदांग चट्टे यांची उपस्थिती होती. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असून त्यांचे विचार घेऊन जगलो तरच जीवनाचा नवीन आरंभ अर्थात शिवारंभ होईल, असे डॉ. माधवी खोडे चवरे पुढे बोलताना म्हणाल्या.

महाराज प्रत्येकाच्या मनात आहे, त्यांच्याविषयी आदर असल्याने आपण येथे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणल्याशिवाय सोशल इंजिनिअरिंगचा फायदा होणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबासोबत झालेल्या शेवटच्या संवादाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे प्रत्येकाच्या मनात स्वराज्याचा विचार बिंबविला होता, यावरून दिसून येते, असे कुलगुरू म्हणाल्या. महाराजांच्या कार्यकाळात समाज सहनशील, सर्व-धर्म समभाव मानणारा होता. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज वेगळा, प्रत्येकाचे कार्य वेगळे असले तरी ध्येय एकच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा दैनंदिन जीवनात वापर करावा लागेल. प्रत्येकाचे कार्य वेगळे असल्याने कोणासोबतही स्पर्धा करू नका, दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा, असे त्या म्हणाल्या. मोबाईल हे एक प्रकारे अस्त्र असल्याने त्यावर व्यक्त होताना सद्सदविवेकबुद्धीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. समाज माध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने काय खरे आणि काय खोटे कळणार नाही. त्यामुळे एआयच्या माध्यमातून चुकीचे संदेश पसरणार नाही, यासाठी आपल्याकडे असलेला बुद्धीचा वापर करावा, असे ते त्या म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशभक्तीची प्रेरणा निर्माण केली – वेदांग चट्टे
पदव्युत्तर इतिहास विभागात जय शिवराय स्टडी सर्कल अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सोशल इंजिनिअरिंग’ या विषयावर आयोजित प्रथम व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी जनतेमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण केली, असे प्रतिपादन व्याख्याते वेदांग चट्टे यांनी केले. स्वराज्य निर्मिती पूर्वी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, झालेली अनेक आक्रमणे, यामुळे येथील समाजाला पारतंत्र्याची सवय झाली होती. अशा सामाजिक स्थितीत पारतंत्र्याची बेडी तोडत स्वतःचे, अर्थात स्वराज्य निर्माण करणे सोपे नव्हते. अशा कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांमध्ये स्वराज्य अर्थात देशभक्तीची प्रेरणा जागृत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षीच बुद्धीचातुर्याने मुलुख गाजविला. विविध समाजातून स्वराज्यासाठी आवश्यक असलेले मावळे त्यांनी निवडले. कोणत्या माणसाला कोणते कार्य द्यावे, महाराजांनी हे हेरले होते आणि तेच काम त्यांना देत स्वराज्य निर्माण केले. प्रतापगडावर आक्रमण होत असताना रायगडावरील व्यक्तीला तेथे लढाई करण्यास जावे असे का वाटत होते, असे ज्वाजल्य विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये निर्माण केले होते. स्वतःचे राज्य हवे असेल स्व:इच्छेने लढायचे असेल, काहीही घेऊन लढावे लागेल अशी लढवय्यी वृत्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केली होती. तत्कालीन सामाजिक चालीरीतींना बाजूला सारून शकून-अपशकून डावलत वैज्ञानिक दृष्टिकोन महाराजांनी बाळगला होता. छत्रपती शिवाजी महाराज मृत्यूची सढळ हाताने सामना करीत होते. त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःला अर्पण केले होते, असे अनेक उदाहरणे यावेळी चट्टे यांनी दिली.
मनोगत व्यक्त करताना राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांनी विद्यापीठातील इतिहास विभागात उद्घाटित झालेला जय शिवराय स्टडी सर्कल हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विस्तृत माहिती देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी ऐकायचे असेल, ज्ञान मिळवायचे असेल तर या स्टडी सर्कल मध्ये इतरांना यावेसे वाटेल असे ज्ञानकेंद्र ठरावे, असे डॉ. बनसोड म्हणाले. प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख तथा मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी ‘जय शिवराय स्टडी सर्कल’ स्थापने मागील माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी केले तर आभार डॉ. लक्ष्मण गोरे यांनी मानले कार्यक्रमाला विविध विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

