41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया पालिकेतील अधिकारी-कर्मचारी टेबल सोडून गायब

गोंदिया पालिकेतील अधिकारी-कर्मचारी टेबल सोडून गायब

0
1446
गोंदिया पालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी दुपारी १२ पर्यंत कार्यालयातच नव्हते

blank

गोंदिया,दि.२८ः गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्यासह गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचकच राहिला नसल्याने दिसून येत आहे.गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने नगरपालिकेत फेरफटका मारल्याव नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत कार्यालय, टेबल सोडून इतरत्र तास न् तास बाहेरच फिरत असल्याचे निदर्शनास आले,तेच चित्र आज २८ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यानही बघावयास मिळाले.या पालिकेतील एकही अधिकारी हा आपल्या नोकरीच्या कार्यकाळात इमानेइतबारे कार्यालयीन वेळेत हजर राहिला असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल अशी वेळ आली आहे.

blank
पालिकेच्या बांधकाम विभागातील रिकाम्या खुर्च्या

गोंदिया नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे तर वेळापत्रकच निश्चित नाही.मात्र वेळ मारुन नेण्याकरीता आम्ही या..या….प्रभागातील कामाची पाहणी करण्याकरीता आलो असे सांगायला विसरत नाहीत.काही कर्मचारी तर कार्यालयातच येत नाही.आपल्या घरुनच ते काम करीत असल्याची ओरड असून येथील बहुतांश कर्मचारी स्वतःच कंत्राटदार व पुरवठादार होऊन इतरासोबंत भागिदारीने काम करीत असल्याची चर्चा आहे.लेखा विभागातील कर्मचारी तर स्वतःला मुख्याधिकारी समजूनच काम करतात,त्यांच्या कार्यालयात आलेले देयके महिनोमहिने पडून असतात,मात्र ते निकाली काढायला यांना वेळच दिसून येत नाही. या नगरपालिकेला अ वर्ग दर्जा आहे.मात्र अ वर्ग सारखे कामकाज काहीच नाही.अधिकारी कर्मचारी यांच्यावर आजच्याच मुख्याधिकारींचा नव्हे तर आजपर्यंतच्या एकाही मुख्याधिकार्याचा वचक राहिलेला नाही.कारण त्यांनीही आपला अर्धा कार्यालयीन वेळ आपल्या बंगल्यातच घालविला असल्याने धाकच राहिलेला नव्हता.blank

आता तर प्रभारी अधिकारी असल्याने त्यांनाही कुणीही मोजत नसल्याचे दिसून येत आहे.सामान्य प्रशासन विभागातील प्रशासन अधिकारी राणे हे एकमेव अधिकारी आपल्या कार्यालयात नेहमीच हजर दिसतात,मात्र त्यांनाही कुणी एैकत नसल्याने नगरपालिकेचा कारभार सैरभैर झालेला आहे.पालिकेच्या विविध विभागास अचानक भेट देऊन तपासणी करण्यासाठी तपासणी पथक स्थापना केले जाते.जागेवर उपस्थित नसलेल्या, काम सोडून बाहेर फिरत असलेल्या, उशिराने येणार्‍या बेशिस्त कर्मचार्‍यांवर हे पथक कारवाई करते.मात्र गोंदिया नगरपालिकेमध्ये हे पथक सुध्दा कागदावरच असून २०१७ साली निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची मुदत २०२२ रोजी मुदत संपली आहे. परिणामी मार्च २०२२ पासून राज्य सरकारने मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्व विभागातील शिस्त बिघडली आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. मुख्याधिकारी यांचे विविध विभागावर नियंत्रण नसल्याने अधिकारी-कर्मचारी आपल्या कार्यालयातील टेबलवरुन गायब होऊ लागले आहेत. कित्येक कर्मचारी कार्यालयीन वेळेत टेबल सोडून व्यक्तिगत कामानिमित्त बाहेर जात आहेत. त्यामुळे कार्यालयाची तसेच विभागाची शिस्त बिघडून प्रत्येक कर्मचारी मनमानी पध्दतीने वागू लागला आहे.

blank