महाराजस्व अभियान : महसूल सप्ताहात महिला जागृती

0
7

आमगाव,दि.18 : शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत १ ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल आठवडा राबविण्यात आला. यात महिला खातेदारांसाठी गावपातळीवर डी.फॉर्म. कॉलेज रिसामा येथे महिला मेळावा घेण्यात आला. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
उद््घाटन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते, पं.स. सभापती हेमलता डोये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार एस.जी. पवार, तालुका कृषी अधिकारी धरमशहारे उपस्थित होते.
तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही महसूल मंडळात गावपातळीवर मेळावे घेतले. त्यात महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार राठोड यांनी सांगितले.
या महिला मेळाव्यात लक्ष्मीमुक्ती योजनेद्वारे गाव नमूना, सातबारामध्ये सहहिस्सेदार म्हणून पत्नीच्या नावाची नोंद करणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजना, महिला वारसांची नावे, कब्जेदार सदरी दाखल करणे, हक्कमोड, महिलांचे कायदेशीर हक्क, दारूबंदी, हुंडाबंदी, महिला अत्याचार प्रतिबंध, संजय गांधी निराधार योजना, महिला खातेदारांच्या वहिवाट रस्त्यांच्या अडचणी, रोजगार हमी योजना, शिधापत्रिका, मतदार यादी, आधार जॉबकार्ड, विविध दाखले, प्रधानमंत्री पीक विमा योजना, स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना, तसेच सातबारा, गट अ, वारसांचे फेरफार, शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, डोमिसाईल, उत्पन्नाचे दाखले, आम आदमी विमा योजना व लक्ष्मीमुक्ती योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी डी.एम. मेश्राम, कठाणे, तलाठी के.एम. पटले, एम.डी. कोहपरे, एन.एन. दंडाळे, एस.एस. पाटील, एस.डी. बोबडे, घायवट, कर्मचारी मारबते, रहांगडाले, आर.बी. राऊत, शिपाई दिगंबर खुणे व कोतवाल यांनी सहकार्य केले. संचालन डी.एम. मेश्राम यांनी केले. आभार एम.आर. केंद्रे यांनी मानले. शेवटी आठवडाभरात प्रत्येक मंडळाच्या गावात होणार्‍या कार्यक्रमांचा लाभ महिला खातेदारांनी घेण्याचे आवाहन तहसीलदार साहेबराव राठोड यांनी केले.