
गोंदिया – शहरातील सहेजपूर दांडेगाव येथील रहिवासी सलोचना रंजनकुमार नागपुरे (वय ३९ वर्षे) यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मीरावत हॉस्पिटल येथे डॉ. वैद्य यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता आहे आणि तातडीने AB- निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असून हजारो लोकांमध्ये एखाद्याचामध्ये आढळतो.
परिवारातील सदस्यांनी रक्तमित्र विनोद चांदवानी (गुड्डू) यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच विनोद चांदवानी यांनी तात्काळ त्यांच्या नियमित AB- रक्तदात्यांच्या यादीतील शाम नोतानी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
शाम नोतानी यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकमान्य ब्लड बँक येथे जाऊन AB- रक्तदान करून माणुसकीचे उदाहरण साकारले. त्यांच्या या रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचले.
या प्रेरणादायी आणि मानवीय कार्याबद्दल विनोद चांदवानी (गुड्डू) व अपूर्व लिलहारे यांनी शाम नोतानी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
नागपुरे कुटुंबियांनी रक्तदाता शाम नोतानी तसेच रक्त समन्वयक विनोद चांदवानी यांचे मनःपूर्वक आभार मानले व समाजासाठी हे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.