
गोंदिया ः कंत्राटी भरतीला विरोध करीत विविध मागण्यांसाठी येथील शासकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी गुरुवारपासून (ता. १७) कामबंद आंदोलनाला सुरवात केली आहे.परिचारिकांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्यसेवा कोलडमली आहे.वेतन त्रुटी खंड-२ तसेच खुल्लर समितीनुसार, अधिपरिचारिका, परिसेविका ही प्रत्यक्ष रुग्णसेवा देणारी पदे आहेत. पाठ्यनिर्देशिका हे अविरत परिचर्या शिक्षण देणारे पद असून,या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण झाले नाही. त्यामुळे इतर पदांप्रमाणे या पदांनाही वेतनवाढ द्यावी, परिचर्या संवर्गातील शुश्रुषा, शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदांची कायमस्वरूपी शंभर टक्के पदभरती करण्यात यावी, ६ जून २०२५ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिकांना वगळून कायमस्वरूपी पदभरती प्रक्रिया सुरू करावी, वाढती लोकसंख्या व अतिरिक्त खाटांनुसार नवीन आकृतीबंध मंजूर करण्यात यावा, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, राज्यातील परिचारिकांना केंद्र सरकारप्रमाणे सरसकट सात हजार २०० रुपये नर्सिंग भत्ता मंजूर करून लागू करण्यात यावा, गणवेश व धुलाई भत्ता दरमहिन्याला १८०० रुपये मंजूर करून देण्यात यावा, परिचारिका संवर्गातील पदवीप्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत देय असलेला प्रोत्साहन भत्ता सर्व संस्थांमध्ये देण्यात यावा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर परिचारिका संवर्गासाठी शुश्रुषा संचालक/ सहसंचालक पदाची निर्मिती करण्यात यावी, रुग्णालयांमध्ये सर्व सोयीयुक्त पाळणाघर उपलब्ध करून द्यावे, परिचारिकांच्या आस्थापनाविषयक कामकाजातील दिरंगाई दूर करावी, बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांप्रमाणे जीएनएमच्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी जिल्हा परिचारिका संघटनेच्या बॅनरखाली परिचारिकांनी हे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे आरोग्यसेवा कोलमडली असून, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.





