
गोंदिया,दि.२९ः नगरपरिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या गोविंदपूर येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळेमध्ये PWD विभागाच्या माध्यमातून 28 लाख रुपये खर्चून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाली व वॉल काँक्रीटचं काम करण्यात आले होते.परंतु प्रत्यक्षात या कामाचा उद्देशच फसल्याचे या पावसाने उघड केले आहे.उलट शाळेच्या आवारात यंदाच्या पावसाळ्यात पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी साचू लागले आहे. फक्त दोन दिवसांच्या पावसातच परिसर जलमय झाला असून,आणखी काही दिवस सतत पाऊस झाल्यास पाणी थेट इमारतीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेतील शैक्षणिक साहित्यही या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे काम 2023 साली करण्यात आले असून, त्याआधीच कार्यकारी अभियंता लभाने यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.”राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या सरकारच्या कामामध्ये दूरदृष्टी आणि पारदर्शकता आहे.पण हाच का तो पारदर्शकपणा?” असा रोष व्यक्त करत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुरेश विश्वनाथ ठाकरे यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या कथित बोगस कामामागील जबाबदारी कोणाची? 28 लाखांचा निधी नेमका कुठे खर्च झाला?हे प्रश्न आज उपस्थित होत आहेत. स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी सुरेश विश्वनाथ ठाकरे व स्थानिक नागरिकांची आहे.





