
भक्तिला उधाण : १३०० किलोमीटर पायदळ प्रवास पूर्ण
बुलढाणा —खामगाव ते शेगाव महामार्गावर ३१ जुलैच्या सकाळी लाखो भाविकांनी संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत केलेल्या पायदळ वारीने भक्तिला अक्षरश: उधाण आले. पंढरीनाथाची भेट घेत आषाढी एकादशीची वारी करून ‘श्रीं’ची पालखी गुरुवारी स्वगृही परतली आहे. संत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. ३३ दिवस चालून ७५० किलोमीटरचा जाण्याचा आणि २१ दिवसांत परतीचा ५५० असा १३०० किलोमीटरचा प्रवास आज पूर्ण झाला. नऊ जिल्ह्यांमधून पालखीचे मार्गक्रमण झाले.
२ जूनला पालखी मार्गस्थ झाली होती. आषाढी सोहळ्यात सहभागी होऊन सहा दिवसांचा मुक्काम झाला. पंढरपूर येथून १० जुलै रोजी निघालेल्या ‘श्रीं’च्या पालखीने २१ दिवसांत पायी वारी करीत संतनगरी गाठली. उन्ह, वारा आणि पावसाचा मारा झेलत सातशे वारकऱ्यांनी परतीचा प्रवास केला. वारीच्या अंतिम टप्प्यात खामगाव येथे मुक्काम झाला. ३१ जुलैला पहाटेच पालखी संतनगरीकडे निघाली. खामगावपासून ते शेगावपर्यंत १६ किलोमीटर अंतरात तीन लाखांवर भाविकांनी पायदळ वारीत सहभाग घेतला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी भक्तिभावात स्वागत करीत ‘श्रीं’चे आशीर्वाद घेतले. टाळ, मृदंगासह विठ्ठलाच्या नामाचा गजर आणि गजाननाचा जयघोष करीत भाविक पुढे सरकत होते. पालखी शेगावच्या वेशीवर दाखल होताच आसमंतात श्री गजानन, जय गजाननचा घोष गुंजला. शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी साडेदहा वाजता पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. गजानन वाटिका येथे व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनीही दर्शन घेतले.
गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे ५६ वे वर्ष आहे. पालखी मार्गावर स्थानिक भाविकांनी सुरेख रांगोळी रेखाटून स्वागत केले.
भक्तांची मनोभावे सेवा
ठिकठिकाणी भाविक, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता, फराळ, पाणी, अल्पोपाहाराची व्यवस्था करून मनोभावे सेवा केली. गजानन वाटिकेवर वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सायंकाळी मंदिरात दाखल
वाटिकेपासून दुपारी दोन वाजता पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. चौकाचौकात स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी मंदिरात पोहोचली. अभंग गात आणि रिंगण सोहळा तसेच आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
जिकडे पाहावे, तिकडे गजाननभक्त
बुधवारपासूनच भाविक खामगाव येथे मुक्कामी होते. गुरुवारी पहाटे साडेपाचला पायदळ वारी सुरू झाली. शेगावला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर केवळ भाविकच दिसत होते. जिकडे पाहावे तिकडे गजाननभक्तांची मांदियाळी नजरेस पडली. सर्व रस्ते गर्दीने गजबजले होते.
दर्शनाला चार तास
अर्धा, पाऊण तासांत दर्शन होईल, अशी व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाने केली आहे. आज तीन लाखांवर भाविक जमल्याने समाधीस्थळी दर्शनाकरिता दर्शन बारीत चार तासांचा अवधी लागला. श्रीमुख दर्शनाला एक तास लागत होता. मंदिरात जवळपास ८० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
तगडा बंदोबस्त, जादा बसेसची सेवा
अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने आठ पोलिस निरीक्षक, ३५ अधिकारी, २६१ कर्मचारी, ३१ वाहतूक पोलिस, ६२ साध्या वेशातील पोलिस, इतर ६८ असा पाचशेवर पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच एसटी महामंडळानेही भाविकांच्या परतीच्या प्रवासाकरिता ३९ बसगाड्यांची व्यवस्था केली होती. मलकापूर ५ गाड्या, मेहकर ९, चिखली ७, खामगाव ६, शेगाव ११ गाड्या, जळगाव जामोद आगारातून ७ बसेस सोडण्यात आल्या होत्या.
गुरुवारचा योग
गुरुवार हा संत गजानन महाराजांचा दिवस मानला जातो. दर गुरुवारी संतनगरीत दर्शनासाठी गर्दी असते. पालखी विदर्भ पंढरीत पोहोचली तो दिवसही गुरुवारच होता. त्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला.





