
मेहकर पोलिसांची कामगिरी : पिस्तूल, चाकू, कोयत्यासह घातक शस्त्रे जप्त
बुलढाणा —मेहकर तालुक्यातील मोळा रोडवरील जामगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना मेहकर पोलिसांनी शिताफीने पकडले. दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपींमध्ये महिलेचा समावेश आहे. टीनपत्र्याच्या एका घरात हे दरोडेखोर दडून बसले होते. आरोपींच्या ताब्यातून पिस्तूल, चाकू, कोयता, ड्रील मशीन, दोर असे साहित्य जप्त करण्यात आले. ३० जुलैच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही धाडसी कारवाई करण्यात आली.
काही दरोडेखोर दरोड्याच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मेहकर पोलिसांनी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व मेहकर उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना माहिती सांगितली. धाड घातल्यानंतर पोलिसांनी आरोपींजवळून देशी बनावटीचे पिस्तूल, वाहन पंक्चर करण्यासाठी दोन खिळे लावलेल्या लाकडी फळी, मोठा पेचकस, चाकू, ड्रील मशीन, दोन नायलॉन दोऱ्या व तीन मोबाइल जप्त करण्यात आले.
मेहकर पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप बिंराजे, पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार, पोलिस उपनिरीक्षक गणेश कड, संदीप मेधने, नितीन मिंड, एएसआय सुरेश काळे, सुखदेव ठाकरे, लक्ष्मण कटक, विजय बेडवाल, प्रभाकर शिवणकर, मोहंमद परसुवाले, इब्राहिम परसुवाले, राजेगावकर, संजय पहारे, आशिष राठोड, सलीम गवळी, गणेश वैद्य, समाधान आरमाळ, आम्रपाली सरकटे यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
आरोपींची नावे
शेख जुनेद शेख इरफान (२७, पैनगंगानगर मोळा रोड मेहकर), निखिल सिद्धेश्वर सोळंके (२४, पवनसूतनगर, मेहकर) व श्रीमती किरण प्रदीप बळी (वय ३७, केलेश्वरनगर डोणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.





