खापावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार, आमदारांना घेराव घालणार

0
7

तुमसर : येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी जमावाने आपले गर्‍हाणे ऐकवण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. येथील आमदार, खासदार यांनी दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. आठवडाभरात खापावासीयांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर आमदार, खासदारांना घेराव घालणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, पमा ठाकूर, उषा जावळे, अंकुर ठाकूर उपस्थित होते. यावेळी भुरे यांनी, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांचे बेहाल झाले आहेत. रूग्णालयात तीन स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञाची जागा असताना केवळ एकच जागा भरण्यात आली आहे. इथल्या परिचारिकांच्या उर्मठ वागणुकीमुळे जनता त्रस्त झाली आहे. डॉक्टर मुख्यालयी राहत नाही आदी समस्या असताना आमदारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. परिणामी अशा घटनांना सामोरे जावे लागते व नागरिक जेव्हा प्रशासनाचा विरोध करतात त्यांच्या चुका त्यांच्या समोर दाखविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. या अगोदरही आंदोलन, रास्तारोको करण्यात आले. परंतु कधीच असे घडले नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांना शेवटपर्यंत समजाविण्याचा कार्य केले. मात्र त्यांनाही हेतुपुरस्सर या प्रकरणात गोवण्यात आले व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच बरोबर गावातील इतरही नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले जाणार आहे. असे असताना येथील आमदार, खासदारांनी मौन बाळगले आहे. शासनस्तरावर प्रयत्न करून खापा वासीयांवरील गुन्हे मागे घेणे, लाठी चार्जचे आदेश देणार्‍या त्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करणे तसेच पीडिताच्या परिवाराला १0 लाख रूपयाची मदत करणे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी समोर येऊन आमदार खासदारांना घेराव घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.